विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत चालली आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारकांचीही संख्या वाढत चालली आहे, तर काही भागात भूमिहीन होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्यातील जमीन वापराच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकांमध्ये पिकांखालील निव्वळ क्षेत्रात ३० लाख हेक्टरने घट झाली आहे, त्याविषयी….
जमीन वापराची राज्यातील स्थिती काय?
विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत चालली आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारकांचीही संख्या वाढत चालली आहे, तर काही भागात भूमिहीन होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सन २०२२-२३ च्या जमीन वापर आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी पिकांखालील निव्वळ क्षेत्र १६४.९० लाख हेक्टर (५३.६ टक्के) आहे. २००४-०५ च्या आकडेवारीनुसार निव्वळ पेरणी क्षेत्र १७४.९ लाख हेक्टर (५६.८६ टक्के) होते. म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये पिकांखालील क्षेत्रात तब्बल ३० लाख हेक्टरने घट झाली आहे. २००४-०५ मध्ये राज्यात नापीक व मशागतीस अयोग्य आणि मशागतयोग्य पडीक क्षेत्र ८.५९ टक्के, इतर पडीक क्षेत्र ८.२० टक्के, गायराने, चराऊ कुरणे व किरकोळ झाडे-झुडुंपाखालील क्षेत्र ४.८८ टक्के तर बिगर-शेती वापराखाली आणलेले क्षेत्र ४.५३ टक्के होते. २०२२-२३ च्या स्थितीनुसार लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन १२ टक्के, लागवड न केलेली इतर जमीन ८ टक्के, पडीक जमीन ९ टक्के इतकी आहे.