शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विठ्ठलाची दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. आजी आजोबांनी विठ्ठल रखुमाई, विविध संत आणि वारकरी यांचा पेहराव केला होता.
वृध्दाश्रमात फुगडी, रिंगण, लंगडी नृत्य आणि ढोल ताश्यांच्या गजर सादर झाला. ढोल आणि लेझीमच्या तालावर आश्रमातून दिंडी निघाली. आजींच्या डोक्यावर तुळशी, आजोबांच्या हातात झांजा तसेच लेझीम नाचत गाजत विठुरायाची दिंडी वृद्धाश्रमातून निघाली. आजी आजोबांच्या उत्साहात असलदे व कोळोशी ग्रामस्थ सहभागी झाले. या कार्यक्रमात दिविजा वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी वर् व संचालक संदेश शेट्ये, श्रीम संध्या गायकवाड, सौ. अमृता थळी, श्री व सौ उज्वला लोके, सौ सुखदा देवरुखकर व अन्य उपस्थित होते.
पंढरपूरला जात विठ्ठलाचे दर्शन शक्य नसले तरी वृध्दाश्रमात साक्षात् पंढरीचा अनुभव आल्याची प्रतिक्रिया वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी व्यक्त केली.