बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा दाणोली मार्गावर वाफोली नळ योजना विहिरी जवळील पुलावर खड्डेमय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गत वर्षी प्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला व पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोन महिन्यांपुर्वी केलेले डांबरीकरण असून देखील, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावर भले – मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे.
वाहन धारक संबंधित विभागाच्या व ठेकेदाराच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. आंबोली, आजरा, स्थानिक युवक हे गोवा मोपा विमानतळ येथे कामासाठी याच जवळच्या मार्गाचा अवलंब करत आहे. रात्रीचा अपरात्रीचा प्रवास करताना पुलावरील खड्डे पाहून जीव मुठीत घेऊन येतात. बेळगाव,काेल्हापूर,पुणे तसेच आंबोली वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याच अवलंब करत असतात.
संबधित विभागाने तात्काळ सदर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा वाफोली सरपंच उमेश शिरोडकर यांनी दिला.