मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वृक्ष लागवड कार्यक्रम काळसे -धामापूर येथे संपन्न झाला. स्थानिक वृक्षांची लागवड ही त्या परिसंस्थेला, त्याठिकाच्या जैवविविधतेला, मृदेला उपयुक्त ठरते याच उद्देशाने स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करून स्थानिक वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी स्थानिक वृक्ष पंगारा याच्या संख्येत झालेली घट व त्यामागच्या कारणांची सखोल माहिती व स्वानुभव कथन करून स्थानिक वृक्ष संवर्धन महत्त्व स्पष्ट केले. तसेच वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे चे श्री. प्रथमेश काळसेकर यांनी स्थानिक वृक्षाचा त्यांनी केलेला अभ्यास, स्थानिक प्रजातीचे महत्त्व विषद केले. महाविद्यालयाचे एन एस एस व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ देविदास हारगिले यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन याविषयी माहिती दिली.यावेळी उंबर, पिंपळ, आपटा, कदंब, सातवीन, कुंभ, करंज, ऐन, बेल, चिंच, टेटू, इरय, सीताअशोक, हिरवा, चाफा, नागचाफा, ताम्हण, बकुळ, कांचन, बहावा, सुरंगी या स्थानिक प्रजातींची एकूण ७५ झाडे लावण्यात आली. ही सर्व झाडे वयम फॉरेस्ट नर्सरी,काळसे यांच्या मार्फत पुरविण्यात आली होती.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एन एस एस प्रमुख डॉ. प्रा. देविदास हारगिले, काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर, वयम फॉरेस्ट नर्सरीचे प्रथमेश काळसेकर, प्रणव काळसेकर, शैलेश काळसेकर, स्यमंतक चे मोहम्मद शेख, मनोज धमापूरकर, विष्णू परब आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे ५० एन एस एस विद्यार्थी आणि काळसे, धामापूर येथील स्थानिक ग्रामस्थ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हसन खान तर आभार प्रा. प्रमोद खरात यांनी मानले.