येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आयोजन
बांदा | राकेश परब : बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १८ किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या. बांदा-निमजगा येथील दिव्या सुभाष देसाई या विद्यार्थिनीने साकारलेल्या प्रतापगडच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला.
किमया संतोष परब (सिंधुदुर्ग किल्ला), रणझुंजार ग्रुप (पद्मदुर्ग किल्ला) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अरविंद आशुतोष भांगले (पुरंदर किल्ला) व प्रज्वल केसरकर, साईशा केसरकर (पन्हाळगड किल्ला) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. स्पर्धेचे परीक्षण पत्रकार निलेश मोरजकर, आर्टिस्ट रणजित बांदेकर, शिक्षक सीताराम गवस यांनी केले. यावेळी लक्ष्मण कळंगुटकर, भूषण सावंत, तेजस परब, अमोल माळवदे, अनुज बांदेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार दिनांक १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रखुमाई सभागृहात होणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.