मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे प्रत्येक शनिवारी भाकरी डे हा नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा केला जात आहे. या दिवशी शाळेतच खिचडी ऐवजी आहारामध्ये भाकरी व भाजी किंवा आमटी याचा समावेश असतो. अलीकडील काही वर्षात लहान मुलांमध्ये फास्ट फूड चे फॅड आले आहे. घरात आणि शाळेत सुद्धा मुले फास्ट फुड खाताना दिसतात. मात्र अशा फास्ट फूड आहारामुळे लहान मुलांच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भुकेच्या समस्या, अपचन पोटाचे, आतड्याचे विकार अशा अनेक व्याधी लहान मुलांना होत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे आहारामध्ये पौष्टिक अन्नाचा अभाव होय. यावर उपाय म्हणून सदर उपक्रम हा शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाताडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ इत्यादी धान्याची भाकरी खाल्ल्याने शरीराला आवश्यक कार्बोदके प्रथिने मिळतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तसेच कॅल्शियम आर्यन मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर मिळण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात. रक्तपेशी वाढतात व रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढून शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त राहते. शरीराची वाढ झपाट्याने होते. शाळेतच मुले, पालक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस यांच्या सहकार्यातून भाकरी बनवली जाते व तिचे आहाराच्या वेळी वाटप केले जाते.
यासाठी पालक, दानशूर व्यक्ती भाकरीसाठी आवश्यक नाचणी, बाजरी, ज्वारीचे पीठ उपलब्ध करून देतात, शुभारंभाच्या वेळी गावचे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, माजी उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विकास परब, उपाध्यक्ष सौ.ज्योती मसुरकर, शाळेतील सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.