चिंदर | विवेक परब : सामान्यांना परवडणार्या उडाण योजनेनंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश केल्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास अडिच हजार रुपयांत करता येणार हे सुखद अप्रूप सिंधुदुर्गवासीयांना होते. विमानतळ सुरू झाल्यामुळे अडिच हजार रुपयांत कोकणात विमानाने जाण्याचे व कोकणातून मुंबईकडेही विमानाने झेपावयाचे स्वप्न सत्यात उतरले असतानाच असतानाचं विमान तिकीटाचा दर वाढल्याने आता विमान प्रवास महागला आहे. महिन्याभरातच मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ तिकिटाचे दर 12 हजार रुपये झाला आहे.
सिंधुदुर्गातून मुंबई आणि मुंबईतून आपल्या गावी सिंधुदुर्गात येण्यासाठी चाकरमानी तसेच स्थानिक प्रवाशांना अडिच हजार रुपये तिकीट दर हा काही अंशी परवडणारा होता. मात्र दिवाळी सण संपताच सिंधुदुर्ग मुंबई विमान प्रवास भाड्याने मोठे उड्डाण केले असून अडीच हजार रुपयाला मिळणारी विमान तिकीट आता 12 हजार रुपयाला मिळत आहेत. तब्बल चौपट वाढलेल्या विमान तिकीट दरामुळे सिंधुदुर्ग मुंबई प्रवास चिपीपेक्षा गोव्यातून मुंबईपर्यंत विमानाने केलेलाच उत्तम आहे किंवा रेल्वे व आरामगाड्यांनाच पसंती दिली जाईल अशी भावना सामान्य सिंधुदुर्ग वासियांकडून व्यक्त होऊ लागली आहे.