बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील मडुरा दशक्रोशीतील मडुरा, रोणापाल, कास, सातोसे, पाडलोस, निगुडे या गावांसाठी कायमस्वरुपी वायरमन कार्यरत नाही. केवळ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांकडून किरकोळ कामे केली जातात. अधिकृत वायरमन नसल्याने ग्राहकांना वारंवार वीज समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याची दखल वीज वितरणने आठ दिवसांत घ्यावी अन्यथा नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी वीज वितरणला दिला आहे.
तौक्ते चक्रीवादळावेळी मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरणला सर्वतोपरी सहकार्य केले. परंतु याची थोडीसुद्धा जाणीव अधिकाऱ्यांना नसल्याने पाच ते सहा गावांना वायरमनविना वाऱ्यावर सोडले. सद्यस्थितीत कंत्राटी कर्मचारी जबाबदारी घेण्यास तयार नसतात. प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकतो, या भागातील वीज बिल वसुली बऱ्यापैकी आहे मात्र महावितरणला चुकीच्या धोरणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तरी येत्या आठ दिवसांत दशक्रोशीसाठी कायमस्वरुपी वायरमन नियुक्त करावा अशी मागणी यशवंत माधव यांनी केली.
यापूर्वी प्रत्येक गावासाठी वीज ग्राहकानुसार वायरमन होते, परंतु काही वायरमन सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. कोरोना काळात अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे पात्र तरूणांना संधी द्यावी व दशक्रोशीतील वीज समस्या कायमस्वरुपी मार्गी लावाव्यात. वीज ग्राहकांनी वीजबिले भरताना दुर्लक्ष करावे काय, असा सवाल करत येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी वायरमन नियुक्ती न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर नाइलाज असतो उपोषण छेडावे लागेल, असा इशारा सातार्डा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरण सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता उपअभियंता यांना दिला आहे.