ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना कळविण्यात येते की, ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या सेतू सुविधा केंद्रात दुपारी 1.00 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
शस्त्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form-A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा. (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे.) मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतनीकरण करीता फी रु. 2500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) शासन जमा करणे आवश्यक आहे. शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांचेकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/ पोलीस पाटील/नगराध्यक्ष यांचेकडील दाखला. अर्ज पोस्टाव्दारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.
एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय नेमलेल्या तारखांनाच त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. सावंतवाडी 1 ते 3 डिसेंबर , दोडामार्ग 6 ते 8 डिसेंबर, वेंगुर्ला 9,10 डिसेंबर, मालवण 13 ते 15 डिसेंबर , वैभववाडी 16, 17 डिसेंबर , कणकवली 20 ते 22 डिसेंबर, कुडाळ 23, 24, 27 डिसेंबर, देवगड 28 ते 30 डिसेंबर अशा प्रकारे या तारखेला जिल्ह्यातील त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. संबंधित परवानाधारकांनी याची नोंद घेऊन नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सु्ट्या वगळून) वरीलप्रमाणे कार्यवाही करावी असे अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.