मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चांदेर येथे तळाणी गांवात चालू असलेल्या पुलाच्या कामाबाबत, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या, मालवण विभाग उप अभियंता यांना, मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच श्री. संदीप हडकर यांनी उपसरपंच श्री. राजेश गांवकर व ग्रामपंचायत सदस्य श्री. राघवेंद्र मुळीक यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. आज, गुरुवारी २० जूनला सहाय्यक अभियंता श्री. अजित पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्त करण्यात आले.
ओझर, कांदळगांव, मसुरे, आडवली, भटवाडी हा रस्ता मर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातून जातो. या मार्गावरील चांदेर महसुली गावातल्या तळाणी येथे पुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे त्यामुळे या मार्गावरील एस टी बस सेवा बंद आहे. हे काम धिम्या गतीने होत असल्याने या मार्गावरुन एस टी ने प्रवास करणार्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम येत्या ४ दिवसात पूर्ण करायच्या सक्त सूचना ठेकेदाराला देण्यात याव्यात जेणेकरून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एस टी बसची सेवा सुरळीत होईल व त्यांची गैरसोय टळेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सहाय्यक अभियंता श्री. अजित पाटील यांनी हे निवेदन स्वीकारल्या नंतर संबंधित ठेकेदाराशी संपर्क करुन याबाबतच्या पुढील सूचना दिल्या असून मंगळवार पर्यंत सदर रस्ता वाहतुकीस योग्य होईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती, मर्डे सरपंच श्री. संदीप हडकर यांनी दिली आहे.