तातडीने विद्युत खांब बदलून वाहिनी सुरक्षित करण्यात येणार असल्याची कनिष्ठ अभियंता यांची माहिती.
बांदा | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील, मडुरा हनुमान मंदिर जवळील नवीन बांधकाम केलेल्या पुलावरील विद्युत वाहिनी वाहनांना घर्षण करत आहे. पुलाची उंची वाढल्याने सद्यस्थितीत वीज वाहिनी धोकादायक ठरत आहे. रविवारी संध्याकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला विद्युत वाहिनी घर्षण झाली, मात्र सुदैवाने अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवासी, वाहन चालकांमधून होत आहे. मडुरा येथे सुरू असलेल्या या पुलाचे काम पूर्णत्वास आले. रविवारपासून घाई गडबडीत वाहतूक सुरू झाली, मात्र अन्य धोकादायक स्थितीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. अवजड मोठ्या वाहनांना घर्षण करणाऱ्या विद्युत वाहिनीसाठी उंच खांब उभारणे आवश्यक होते. परंतु याकडे वीज वितरण किंवा बांधकाम विभाग यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने विद्युत खांब बदलून वाहिनी सुरक्षित करण्यात येणार आहे. तशा सूचना ठेकेदारास दिल्याचे यादव यांनी सांगितले.