बांदा | प्रतिनिधी : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व दाखले वेळेत उपलब्ध करण्यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्यांक उप जिल्हाध्यक्ष रियाज़ ख़ान यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
रियाज़ ख़ान यांनी निवेदनात म्हणले आहे की, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय दाखल्याची आवश्यकता असते. हे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची बरीच दमछाक होते. यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सर्व दाखले एकाच ठिकाणी व वेळेत उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.