ब्युरो न्यूज | मुंबई : सध्या उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. राज्यातील अनेक भागात तापमान ४ अंशाच्या वर गेले आहे. प्रचंड तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यानंतर काही ग्रामीण आणि काही शहरी भागांतही वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आज, शुक्रवारी राज्याच्या कारभार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यात देखील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत असून, अखंड २४ तास वीज पुरवठा मिळणाऱ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव राज्यातील मंत्र्यांनीही घेतला.
आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नेहमी वातानुकूलीत घरांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घामघूम व्हावे लागले आहे.
राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने दक्षिण मुंबई भागात येतात. या भागात बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यावर त्वरित बेस्ट इलेक्ट्रिसिटी विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता.
अजित पवार, आदिती तटकरे, शंभूराज देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी वीज पुरवठा खंडित झाला होता. शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याचा प्रकार घडला. यामुळे बंगल्यामधील वातनुकूलीत यंत्रणेसह सर्वच कामकाज ठप्प झाले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कर्मचारी दाखल झाले होते.