राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न 2021 ची मानकरी…!
मनुष्य विकास लोकसेवा अकादमीचा पुरस्कार..
चिंदर | विशेष वृत्त | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर गावातील बाजारातल्या घरी तिची बालपावले नांदली…! पुढे मोठी होता होता शालेय शिक्षणात हुशारी दाखवत तिने दहावीला चक्क 99 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. वाहव्वा, चर्चा तर तिच्या सुरु होत्याच पण किशोर वयातील आधुनीकतेच्या बाह्य वलयासोबत तिचा सामाजिक व व्यावसायिक गाभा प्रगल्भ होत होता.
प्राथमीक शाळेत असताना शाळेच्या भिंतीवरचा एक सुविचार तिच्या जीवनाच्या उद्देशाचा अंकुर बनून गेला होता.
‘ कला ही जीवनाची सावली आहे..’, हा तो सुविचार आणि तो सुविचार वाचून तिने एका सामाजिक कला उद्योगाची सुरवात करून ती बनली तरुण उद्योजिका चित्रीणी अर्थात् 2021 सालची महाराष्ट्र राज्याची युथ आयडॉल ठरलेली प्रियांका पडवळ….!
चिंदर गावची ही सुकन्या राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाॅल कलारत्न पुरस्काराने सन्मानित झालीय.
प्रियांकाला बालपणापासून कलेची आवड आहे. तिने कृषी-व्यवसाय व ग्रामीण विकास प्रबंधन या मध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कलेची व शिक्षणाची सांगड घालून “चित्रिणी” या सामाजिक उद्योगाची सुरुवात केली. याद्वारे भारतीय लोककला जपण्याचा व महिला कलाकार आणि ग्रामीण महिला समूहांना एकत्र आणून रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.
तिच्या या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुरस्कृत आहे. प्रियांका हिला कला क्षेत्रातला हा पहिला पुरस्कार मिळाला.
प्रियांकाला मिळालेले यश हे सर्वतोपरी कलेला देत तिने तिच्या नांवासोबत असलेल्या ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ या घटकाबद्दल तिला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले आहे .
अवघा चिंदर गांव प्रियांकाच्या आत्तापर्यंतच्या यशाबद्दल व तिच्या युथ आयडाॅल कामगिरीबद्दल तिची प्रशंसा करतो आहे.