बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा – आळवाडा येथील तेरेखोल नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका आहे. संबंधित महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आला. येत्या ५ दिवसात डांबरीकरण कामाची सुरुवात न झाल्यास पाईप लाईन फोडण्यात येईल. नंतर होणाऱ्या जन प्रक्षोभाला संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशारा बांदा माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा ( भाजयुमो ) जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी दिला आहे.
तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी पूल उभारण्यात आला आहे. आळवाड्यातून पाईपलाईन जाण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाबरोबर बराच संघर्ष केला. आमदार नितेश राणे यांनी आळवाडा भागातून पाईपलाईन नेऊन तेरेखोल नदीवर पूल उभारण्याचे आदेश दिले होते. यामुळे मडूरे दशक्रोशितील स्थानिकांचा धोकादायक होडी प्रवास बंद झाला आहे. पुलाच्या दुतर्फा मातीचा भराव टाकून जोड रस्ता तयार केला आहे. मात्र, रस्ता डांबरीकरण करण्यात न आल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहने हाकताना चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. भराव टाकलेल्या मातीला पिचींग न करताच दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने डांबरीकरण उरकून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता.
स्थानिकांच्या मागणीवरून जावेद खतिब यांनी शनिवारी रस्त्याची पाहणी केली. प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून डांबरीकरण कामात दिरंगाई होत असल्याबाबत खडे बोल सुनावले. येत्या पाच दिवसात डांबरीकरणाचे काम सुरू न केल्यास पाईपलाईन तोडण्याचा इशारा दिला. तसेच पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांसह सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी जावेद खतीब यांच्यासह शेर्ले ग्राम पंचयतीमध्ये सदस्य शामराव सावंत, विक्रांत नेवगी, मडूरे माजी उपसरपंच उल्हास परब यांच्यासह ग्रामस्थ व वाहन चालक उपस्थित होते.