शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी माध्यमिक विद्यामंदिरचे स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्टँडर्ड चार्टर्ड बॅक मुंबईचे प्रतिनिधी तथा साळशी गावचे सुपुत्र किशोर लाड यावेळी म्हणाले की, संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मला या शाळेचा अभिमान वाटावा अशी योग्य कामे करावयाची आहेत. शाळेची प्रगती हेच आमचे ध्येय आहे.
यावेळी मार्च २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रशालेतील सन २०२३-२४ चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. केतकी साळसकर हिला देण्यात आला. तसेच शाळाबाह्य विविध स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
या प्रशालेची इमारत नूतनीकरण व मुलभूत भौतिक सुविधा सोडविण्याच्या दृष्टीने स्टँडर्ड चार्टर्ड बॅक मुंबई यांच्याकडून मोठे आर्थिक सहकार्य मिळाले.याबद्दल या बॅकेचे प्रतिनिधी किशोर लाड यांचा संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वैशाली सुतार, चाफेड चे माजी सरपंच सत्यवान भोगले, चेअरमन सत्यवान सावंत यानीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साळशीचे सरपंच वैशाली सुतार, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री, भरणीचे सरपंच अनिल बागवे , स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, सदस्य सत्यवान भोगले, किशोर लाड, सुखशांती मंडळाचे माजी अध्यक्ष शशीकांंत कदम व एकनाथ लाड, मुख्याध्यापक माणिक वंजारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी केली. सहशिक्षक संजय मराठे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले आणिआभार स्वप्नील भरणकर यांनी मानले.
यानंतर विद्यार्थी वर्गाचा विविध गुणदर्शनचा तसेच स्वर ऋतु निर्मित स्वर सुरभि हा बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी सदस्य, साळशी, चाफेड , भरणी गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.