खारेपाटण | प्रतिनिधी : मराठी विज्ञान परिषद ही महाराष्ट्र राज्यामध्ये ६५ व महाराष्ट्राबाहेर ५ ठिकाणाहून मराठीतून विज्ञान, गणित व पर्यावरण विषयाच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य करीत आली आहे. मराठी विज्ञान परिषद दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय व आगळेवेगळे कार्य करणाऱ्या संस्थेला सु. त्रिं. तासकर पुरस्कार देऊन सन्मानित करते.
या वर्षीचा मराठी विज्ञान परिषदेचा सु. त्रिं. तासकर पुरस्कार २०२४ या पुरस्काराचा वितरण कार्यक्रम, ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील मराठी विज्ञान भवन चुनाभट्टी, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात रविवार, दिनांक २८ एप्रिलला संपन्न झाला.
या वर्षीचा हा पुरस्कार विज्ञान, गणित व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार, कुडाळ यांना प्राप्त झाला असून संस्थेच्या वतीने कार्यवाह- विश्वस्त श्री. सतीश अंकुश नाईक यांनी स्वीकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये पुरस्कार स्वरुप देऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले. श्री सतीश नाईक हे खारेपाटण येथील तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्या भवन मध्ये व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. मुख्याध्यापक श्री संजय सानप सर्व कर्मचारी वृंदातर्फे त्यांचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले.