मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी येथे, लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाने विरोधकांना धक्का दिला आहे. गेले दशकभर ठाकरे गटाचे अभेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील वायंगणी गावात भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख निलेश राणे आणि प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे साध्य केले आहे. वायंगणी ग्रामपंचायतचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे.
या पक्षप्रवेशा वेळी ग्रामस्थांची उपस्थिती पाहून भाजपा नेते निलेश राणे भारावून गेले. विरोधकांनी केवळ सी वर्ल्ड प्रकल्पावरून राजकारण करून ग्रामस्थांची माथी भडकवत स्वतःचा फायदा करून घेतला. मागील दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे येथील आमदार, खासदार सत्तेत होते. त्यातील अडीच वर्षे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. मग त्यांनी सी वर्ल्डची अधिसूचना रद्द का केली नाही असा सवाल त्यांनी केला. प्रकल्पाला विरोध करताना येथील विकासाचे प्रश्न तसेच ठेवले. आजही याठिकाणी येताना अरुंद रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही कामे ठाकरे गटाने मार्गी का तडीस नेली नाहीत असे सवाल निलेश राणे यांनी करून, केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबाना हवा असता तर या दहा वर्षात त्यांनी सत्तेच्या माध्यमातून सी वर्ल्ड प्रकल्प रेटून नेला असता. जर एकाही ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प मी आणणार नाही, अशी भूमिका राणेसाहेबांनी घेतली आहे असे स्पष्ट केले. यानंतरच्या काळात देखील ग्रामस्थांना नको असेल तर या सी वर्ल्ड प्रकल्पावर लाथ मारणारा निलेश राणे हा पहिला व्यक्ती असेल असेही भाजपा नेते निलेश राणे यांनी स्पष्टपणे नमूद केले.