संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी निसर्गाची साखळी जपण्याचे केले कर्तव्य आवाहन..!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळाने, कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक जीव रक्षणासाठी एक पाऊल उचलले असून याविषयी माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सर्वांनाच याबाबत कर्तव्य आवाहन केले आहे. पशू पक्ष्यांच्या तृषा व क्षुधा शांती म्हणजेच तहान व भूक भागविणे यासाठी होणारी वणवण वैश्विक तापमान वाढीमुळे उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रत्ययीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा विक्रमी म्हणता येईल एवढा कडक उन्हाळा सुरु झाल्याने दिवसाचे तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोचत आहे. ही स्थिती मानवासह अन्य जीवांसाठीही घातक आहे . पशु – पक्षी पाण्यासाठी वणवण करत घराच्या जवळ घिरट्या घालत आहेत. पशू पक्ष्यांचे पारंपारिक अन्न व जलस्रोत हे नाहीसे होत असताना इतर ॠतूंमध्ये ते नजिकच्या सुलभ ठिकाणी त्यांचे जीवन जगू शकतात परंतु उन्हाळ्यात मात्र तिथले स्रोतही ह्या जीवांसाठी पुरेसे ठरू शकत नाहीत. पर्यायाने त्यांचा मृत्यू अटळ असून यामुळे नैसर्गिक जीवसाखळीवर भीषण परीणाम होतो. यासाठीच माऊली मित्र मंडळाच्या वतीने काल १९ एप्रिलला कणकवली येथील जुने भाजी मार्केट आणि श्री. पटकीदेवी मंदिर येथे पशु – पक्ष्यांसाठी भांड्यातून पेय जल आणि धान्य ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी या उपक्रमाबद्दल माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी माऊली मित्र मंडळाचे सल्लागा तथा ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर, साजिद कुडाळकर, सुभाष उबाळे, प्रभाकर कदम, भगवान कासले, बाबुराव घाडीगावकर, प्रदीप कुमार जाधव, प्रसाद उगवेकर, विशाल राजपूत , लक्ष्मणराव महाडिक यांच्यासह श्री पटकीदेवी मित्र मंडळाचे विवेक मुंज, दिपक डगरे, तन्मय उबाळे, विलास चव्हाण उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पेडणेकर म्हणाले की, निसर्गाच्या साखळी मध्ये प्राणी पक्षानांही महत्व आहे. घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी – पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य सर्वांनीच ठेवण्याचे आवाहन देखील पेडणेकर यांनी केले. अन्य सामाजिक संस्था व पक्षीमित्रांनी वन्यजीव व पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रामुख्याने पुढे यावे असेही ते म्हणाले.
यावेळी माऊली मित्र मंडळांचे सल्लागार तथा ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर म्हणाले की निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी – पक्ष्यांनाही महत्त्व आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून माऊली मित्र मंडळ प्राणी – पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.
या उपक्रमाविषयी साजिद कुडाळकर म्हणाले की, सध्या सर्वांनाच उष्णतेच्या तीव्र झळा लागत आहेत. प्राणी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आपण तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत. याच माणुसकीच्या भावनेतून पशु – पक्ष्यांची तहान आणि भुक भागविण्यासाठी भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून आगळा -वेगळा उपक्रम माऊली मित्र मंडळाने राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.