केवळ निवडणुका आल्यावर एकमेकांवर टीका करणे योग्य नसून सामान्य कोकणी माणसांनी देखील एकमेकांच्या विचारांचे व्यापक आदानप्रदान करण्याची गरज असल्याचेही व्यक्त केले मत.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते व माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासाबद्दल एका प्रसिद्धी संदेशाद्वारे भाष्य केले आहे. कोकण ही भूमीच प्रभु परशुरामाने निर्माण केली. तिची रचना, भौगोलिक परिस्थिती याचा गांभिर्याने कुणीही कधीही अभ्यास केला नाही, हेच आम्हा कोकणवासीयांचे सर्वात मोठ दुर्दैव आहे अशी खंत पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही निवडणुका आल्या की एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब करणे आणि टीका करणे हे आता एक अलिखीत समीकरणच झाल्याने, कोकणी माणसाच्या नक्की काय अपेक्षा आहेत हे जाणून घेताना कोणी दिसत नाही त्यामुळे कोकणातील जनतेलाही आपण दुर्लक्षीतच रहाणार असे वाटू लागण्याची शक्यता असल्याचे मत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
केवळ राजकीय लोकच नाहीत तर प्रत्येक कोकणवासीयाने कोकणातील विविध प्रश्नांविषयी एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे, असे प्रसिद्धी संदेशाद्वारे नमूद करत पेडणेकर यांनी आता पूर्वीप्रमाणेच नाक्या नाक्यावर सामान्य माणुस पूर्वीसारखी व्यापक चर्चा करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ही चर्चा घडत असताना त्यातील मर्म समजण्यासाठी परिणामकारक व्यक्ती घटकांना सामान्य जनतेत मिसळून आणि तेही नकळत फिरावे लागते पण हल्ली तसे होताना दिसत नाही असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक ठिकाणी श्रेय वादाच्या शर्यतीत सर्वांगीण विकास अडकून पडलाय अशी टीका राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे आणि यापुढे तरी कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे अशी अपेक्षादेखील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.