मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडवर संपन्न झालेल्या एमपिएल २०२४ लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना ज़ुब फायटर विरुद्ध गुड माॅर्निंग चैतन्य मैदानावर २४ मार्चला संपन्न झाला. ज़ुब फायटर संघाने या स्पर्धेतील ७ व्या पर्वात प्रथमच सहभाग घेत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नाणेफेकीचा कौल ज़ुब फायटर संघाचा कर्णधार बाबुराव तारीच्या बाजुने लागल्यानंतर त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बाबुरावने सलामीला येत ६६ चेंडूत १६ चौकार व ३षटकारांसह १०४ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या शतकाच्या सहाय्याने ज़ुब फायटर संघाने ७ बाद १६३ धावा केल्या. गुड माॅर्निंग चैतन्य संघातर्फे सौरभ कांबळी याने ३ बळी तर कर्णधार राॅकी डिसोजाने २ बळी मिळवले.
( उपविजेते ) गुड माॅर्निंग चैतन्य संघ.)
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुड माॅर्निंग चैतन्य संघातर्फे अनुभवी फलंदाज जॅकी परेरा व सौरभ कांबळी यांनी अनुक्रमे २३ व व २७ धावा जमवत प्रतिकार केला परंतु गोलंदाज आकाश याने ४ बळी व योगेशने ३ बळी घेऊन गुड माॅर्निंग चैतन्य संघाला सर्वबाद १०८ धावांवर रोखले. अखेरीस ज़ुब फायटर संघाने गुडमाॅर्निंग चैतन्य संघाला ५५ धावांनी पराभूत करत एमपिएल २०२४ चषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून बाबुराव तारी याची निवड झाली तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ कांबळी व सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तथा यष्टीरक्षक म्हणून कौस्तुभ मसुरकर यांना गौरवण्यात आले. विजेत्या संघाला ५५, ५५५ रुपये व आकर्षक चषक आणि उपविजेत्या संघाला ३३, ३३३ रुपये व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.
आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन मालवण स्पोर्टस् क्लब यांनी केले होते. यावेळी मालवण स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अंतिम सामन्यातील विजेता संघ ज़ुब फायटर संघाचे संघमालक ज़ुबेर ख़ान, अधिराज खानोलकर आणि उपविजेत्या गुड माॅर्निंग चैतन्य संघाचे संघमालक नितीन वाळके यांची बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर विशेष उपस्थिती होती. अंतिम सामन्यात पंच म्हणून उमेश मांजरेकर, ॲम्रोज आल्मेडा यांनी काम पाहिले तर दीपक धुरी यांनी तिसर्या पंचांची जबाबदारी सांभाळली.