वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील सडूरे – सोनधरणे येथे काल २० मार्चला दुपारी आगीची घटना घडली. या घटनेत काळे कुटुंबीयांच्या आंबा काजू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचा स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत होते. सध्या बागेतून आग विझवण्यास यश आले आहे असे समजते. परंतु या आगीची तीव्रता एवढी भीषण होती की या आगी मध्ये पाच ते सहा बागा जळून खाक झाल्या असून यात सुमारे ५० लाखांच्या वरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या आगीत १)श्री विजयसिंह विठ्ठलराव काळे, विक्रमसिंह काळे व नवलराज काळे. २) जनार्दन भैरू काळे. ३)अजितसिंह विठ्ठलराव काळे. ४)जयसिंह जनार्दन काळे, यांच्या बागेचे नुकसान झाले आहे.अजून ही आग काही प्रमाणात आजू बाजूला पसरत असल्याने बागायतदारांच्या वरील संकट टळलेले नाही. या घटनेत सार्वजनिक नैसर्गिक नळ पाण्याची पाईप लाईन देखील जळून खाक झाली आहे.
घटनास्थळी गटविकास अधिकारी आर. जंगले यांनी भेट देत संबधित अधिकारी कर्मचारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच आमदार नितेश राणे यांनी संबंधित घटनेची भ्रमणध्वनी वरून माहिती घेत नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे. गटविकास अधिकारी आर. डी. जंगले यांच्या समवेत वैभववाडी कृषी विस्तार अधिकार प्रकाश अडूळकर, युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यू व्ही मंदावाडा म, मंडळ कृषी अधिकारी, सी एम कदम कृषी सहाय्यक डी डी म्हासेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोणकर, सरपंच दिपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, कोतवाल मोहन जंगम व संबंधित बागायतदार उपस्थित होते.