शाळेच्या प्रांगणात सापडलेली सोन्याची रिंग केली संबंधीत महिलेच्या स्वाधीन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी गांवकरवाडी अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता अशोक मेस्त्री यांना शाळेच्या प्रांगणात सापडलेली सोन्याची रिंग त्यांनी मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन केली.
केंद्रशाळा साळशी प्रशालेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी रात्री साळशी येथील सुनिता नाईक यांच्या एका कानातील सोन्याची रिंग हरवली. दुसर्या दिवशी गांवकरवाडी अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता अशोक मेस्त्री नेहमीप्रमाणे शाळेत येत असताना त्यांना शाळेच्या प्रांगणात चमकणारी वस्तू दिसली. त्यांनी निरखून पाहिले असता ती सोन्याची रिंग असल्याचे ध्यानात आले. याबाबत त्यांनी चौकशी केली असता ती रिंग सुनिता नाईक यांची हरवलेली सोन्याची रिंग असल्याचे समजले. सौ. अस्मिता मेस्त्री यांनी खात्री करून ती सोन्याची रिंग केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, सहाय्यक शिक्षक संतोष मराठे आणि अंगणवाडी मदतनीस सौ. सविधा किंजवडेकर यांच्या उपस्थितीत सुनिता नाईक यांना स्वाधीन केली. यावेळी सुनिता नाईक यांनी त्यांचे आभार मानले. ती सोन्याची रिंग दिड ग्रॅमची असून बाजारभावानुसार १५ हजार रुपये किमंतीची होती असे समजते. या प्रामाणिकतेबद्दल साळशी गांवकरवाडी अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता अशोक मेस्त्री यांची सर्वांनी प्रशंसा केली आहे.