मच्छिमार सोसायटी व मच्छिमार बांधव हे सोयींपासून वंचित राहिल्याने प्रशासकांना जाब विचारायचे कांदळगांवकर यांनी केले आवाहन…!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे थेट नगरपरिषद प्रशासकांवर हल्लाबोल केला आहे. मालवण मच्छी मार्केट येथे मच्छिमार सोसायटी साठी बांधलेले गाळे मागील दोन वर्षे वापराविना असल्याचे सांगत नगर पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा कांदळगांवकर यांनी आरोप केला आहे. श्री. कांदळगांवकर यांनी पुढे नमूद केले आहे की, मालवण मच्छिमार्केटचे २००६ मध्ये नूतनीकरण करून या ठिकाणी नवीन मार्केट बांधण्यात आले. त्यानंतर २०१६ साली माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी नगरसेवकांच्या कालावधी मध्ये या ठिकाणी मासे विक्रेत्यांना बसण्यासाठी बांधण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचे नूतनीकरण करून सुमारे १०० मत्स्यविक्रीचे कट्टे , त्याखाली मासे ठेवण्या साठी कपाट , पाण्याची सोय करून देण्यात आली. त्याच बरोबर मच्छिमार समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांना केंद्र बिंदू मानून पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे काम २०२० ला पूर्ण करून तिथे विज व्यवस्था करून भाड्याने देण्यासाठी सज्ज करून देण्यात आली. या गाळ्यांचे भाडे ठरविण्याच्या प्रस्ताव नगर रचना विभागास पाठविण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. परंतु आज मिती पर्यंत या गाळ्यांच्या लिलावाबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि हे गाळे आजही वापराविना पडून आहेत त्यांच्या स्वच्छते कडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.
लिलाव न झाल्याने त्या पासून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नाचे नुकसान झालेच आहे परंतु मच्छिमार सोसायटी , मच्छिमार समाज यांना गृहीत धरून बांधलेल्या या सोयींपासून हा समाज ही वंचीत राहिला आहे असाही गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी केला आहे. या बाबत मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासकीय राजवटीत मालवणमधिल अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे व शासनाकडून भाडे ठरवून मिळे पर्यंत या गाळ्यांचे नगरपालिका स्तरावर भाडे ठरवून लिलाव करण्यात येवून शासनाकडून ठरवून आलेल्या भाड्याप्रमाणे भाडे देण्याच्या अटी शर्तीवर गाळे दिले जावू शकतात पण त्यासाठी प्रशासनाची मानसिकताच दिसत नसल्याची खंत महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केली आहे.
हक्काच्या सुखसोयींच्या प्राथमिक मुद्द्यांवर प्रशासकांद्वारे तांत्रिक कारणे व सबबींच्या सारवासारव नाहीतर सततचे दुर्लक्ष या बाबींना आता मालवण शहरवासिय जनता त्रस्त झालेली असून सध्या प्रशासकावर कुणाचाही अंकुश नाही अशी स्तिथी आहे असे कांदळगांवकर यांना या प्रसिद्धीपत्राद्वारे अभिप्रेत असून प्रशासकाच्या निष्काळजीपणा मुळे नगर पालिकेचे जे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ते संबधिता कडून वसूल करणे बाबत शासनाकडे आपण तक्रार अर्ज दाखल करणार आहे असाही इशारा त्यांनी दिला आहे. मश्चिमार बांधवानी, मश्चिमार सोसायटी यांनीही या बाबत आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे. प्रशासकीय कालावधीत प्रशासकाच्या निष्काळजी पणा मुळे आपल्या समाजासाठी तयार करण्यात आलेल्या सोयीसुविधा पासून आपला समाज वंचित राहत आहे याचा जाब प्रशासकाला विचारण्याची गरज आहे असे आवाहन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.