–
प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची उब मिळता
सहज उत्तु जाय रे!
व्हेलेंटाईन डे दरवर्षीप्रमाणे समोर आलाय. दरवर्षी प्रमाणे आता प्रेमाचा बाजार बसेल. कार्डस, टेडीज, चॉकोलेट्स, बॅन्ड्स, डेटिंग, गिफ़्ट्स या साऱ्यांना ऊत येईल. ( हग्ज आणि किसेसची यात मुद्दामच गणती केलेली नाही.) पण या साऱ्यांत प्रेम कुठे असेल? सोशल मिडीया आणि जाहिरातबाजीच्या आजच्या युगात प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण होऊ घातलंय. पण प्रेम ही बाजारात विकण्याजोगी आणि विकत घेण्याजोगी चीज आहे असं तुम्हाला वाटतं?
प्रेम म्हणजे काय….? प्रेमाची तशी कोणतीच व्याख्या नाही. प्रेमाला कोणतंही परिमाण नाही. प्रेमाला आकारमान नाही. प्रेमाला वस्तुमान नाही. प्रेम म्हणजे आपल्या मनात दडलेली एक अतिशय हळवी कोमल भावना, जी जशीच्या तशी शब्दात व्यक्त करता येत नाही. बोलायचं म्हटलं तर शब्द थिटे पडतात. मोजायचं म्हटलं तर क्षितिज उणं पडतं. शब्दांपेक्षाही प्रेम व्यक्त होत ते कृतीतून, आपुलकीतून, स्पर्शातून!
नकोस बोलू शब्द एकही
स्पर्श सांगती सारे
निळ्या नभाला तुझी नि माझी
प्रीत सांगती तारे
स्थल, काल आणि प्रसंगानुरुप आपल्या मनात अनेक भावना उमलत असतात. पण त्या साऱ्या क्षणिक असतात. यातली सर्वात चिरंतन भावना असते ती प्रेम. प्रेमाची रूपं अनेक, प्रेमाचे पैलू अनेक,
प्रेम म्हणजे तुझ्यासाठी
वेडं होऊन झुरणं आहे
प्रेम म्हण्जे तुझ्यावाचून
जितेपणी मरणं आहे
प्रेम म्हणजे तुझं दिसणं
प्रेम म्हणजे तुझं हसणं
प्रेम म्हणजे तुझं नुसतं
माझ्यासोबत असणं
पाश्चिमात्य संस्कृतीनुसार हा ‘व्हॅलेंटाईन डे’ नावाचा प्रेमदिवस वर्षातून एकदाच येतो. भारतीय संस्क्रुतीत प्रेम चिरंतन आहे. त्यांच्यासाठी प्रेम केवळ प्रदर्शन, आपल्यासाठी प्रेम म्हणजे समर्पण. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे भोग तर भारतीय संस्क्रुतीत प्रेम म्हणजे त्याग. स्मशानवासी शंकराच्या प्रेमाखातर राजपाट सोडून स्मशानात रहायला येणारी राजकन्या गौरी म्हणजे प्रेम, श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास स्वीकारल्यानंतर त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून सोबत निघालेली सीता म्हणजे प्रेम. श्रीक्रुष्णाच्या ध्यासापायी हसत हसत विषाचा प्याला ओठाला लावणारी मीरा म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे हळवं गीत
प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत
प्रेम म्हणजे समर्पणाची
जगावेगळी न्यारी रीत
राधा आणि क्रुष्णाच्या प्रेमावर तर खंडकाव्य लिहीली गेली आहेत. जगामध्ये प्रेमकथा अनेक होऊन गेल्यायत, पण भारतीय मनाला शतकानुशतकं भुरळ घालणारी प्रेमकथा कोणती असेल तर ती म्हणजे कृष्ण आणि राधेची. शतकंच कशाला सहस्रकं उलटून गेली तरी सुध्दा त्या प्रेमकथेचा अंमल आपल्या मनावर कायम आहे.
गर्भरेशमी रात्र हळूहळू
क्षणाक्षणाने सरते आहे
ऐक माधवा तुझी राधिका
कणाकणाने झुरते आहे
प्रेम म्हटल की विरह आला. विरहाशिवाय कोणतीच प्रेमकथा पूर्ण होऊ शकत नाही. विरह जेवढा तीव्र तेवढं प्रेम अधिक घट्ट होत जातं.
तू गेलीस त्या दिवसापासून
प्रत्येक दिवस उदास आहे
रात्र नेमाने होते पण तिथला
चंद्र भकास आहे
आभाळ रोज विचारत असतं
तुझ्या घराचा पत्ता
त्याला कस सांगू
इथे मीच हताश आहे!
प्रेमाचा सर्वात ह्र्दय्स्पर्शी पैलू म्हणजे दोघांचं एकमेकांवर प्रेम असणं, पण ते कधीच व्य्क्त न होणं. आयुष्याच्या एका नागमोडी वळणावर कर्तव्यासाठी प्रेमाला तिलांजली द्यावी लागते आणि उभं आयुष्य आठवणींच्या साठव्णीवर झुरत काढावं लागतं.
डोळ्यांमध्ये वादळ आणि
उरावरती घाव आहे
त्याच्या आड डबडबलेला
वेदनांचा गाव आहे
तिथले लाल गुलाब पाहून
माणस फ़सत्तात चट्टदिशी
तिथे माझी स्वप्न गेलीत
माझ्या डोळ्यांदेखत फाशी
प्रेमात प्रत्येकजण पडतो. पण आपल्याला आवडलेल्या व्यक्तीकडून प्रतिसाद लाभावा, प्रेमाची वीण घट्ट व्हावी आणि प्रेम सफल व्हावं! प्रेमाच्या वर्षावात चिंब होत हातात हात घालून आयुष्याच्या अंतापर्यंत ही आनंदयात्रा चालू रहावी याहून दुसरं सद्भाग्य नाही. माझी सात्विक प्रेमाची कल्पना सांगतो तुम्हाला. तुमचं तिच्यावर खरंच प्रेम आहे ना…? मग ते व्यक्त करण्यासाठी टेडीज नकोत, गिफ्ट नकोत, बॅन्डस नकोत. डेटवर जायला नको. एक काम करा. तिच्यासाठी एक मोगऱ्याचा गजरा घ्या. ती समोर आल्यावर तो लपवण्याचा प्रयत्न करुन बघा, पण तो लपणार नाही. मोगऱ्याला चुगली करायची खोड आहे. त्याचा सुगंध तुमच्या मिर्मळ प्रेमाची सतार छेडू लागेल. ती समोर येईल, लाजेल… तेव्हा तो गजरा तिच्या ओंजळीत ठेवा आणि तिला प्रसाद कुलकर्णीच्या कवितेच्या चार ओळी ऐकवा,
तू आहेस म्हणून माझ्या
आयुष्याला अर्थ आहे
तुझ्याविना माझ्या जीवा
उभा जन्म व्यर्थ आहे
मेघावाचून नभामधनं
पाणी कधी झरेल काय
तुला वजा केल्यावरती
मागे काही उरेल काय?
ती काहीच बोलणार नाही. मोगरा अधिकाधिक तीव्रतेने दरवळू लागेल. तिला काय बोलायचंय ते तुम्हाला सांगू लागेल.
बस्स, एवढंच!!
लेखक : प्रसाद कुलकर्णी
गोरेगाव, मुंबई
(९९६९०७७१३३)