वनविभागाने केली पाहणी
कणकवली | उमेश परब : तौक्ते वादळ आणि त्यानंतर निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्याला कारण ठरतायत शेतीचे नुकसान करणारे गवारेडे कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवारेड्यानी थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाने पाहणी करत पंचनामे केले आहेत.
गेली चार वर्षे हळवल गावात गवारेड्यानी शेतीचे नुकसान करण्याचे सत्र सुरूच आहे. तौक्ते वादळ आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असतानाच या गवारेड्यांच्या आगमनामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. हळवल परबवाडी येथील शेतकरी नामदेव परब, अनंत पवार रामकृष्ण पवार, विलास गावडे, जगन्नाथ गावडे, राजेंद्र गावडे स्नेहा गावडे यांच्या शेतीचे गवारेडयांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. परबवाडी येथील या शेतकऱ्याचे सुमारे अडीच एकर भागातील शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत वनरक्षक पल्लवी दाभाडे व हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे तयार केले आहेत. गेली चार वर्षे हे नुकसानीचे सत्र असेच सुरू असून शासनामार्फत मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि मिळणारी भरपाई यात बरीच तफावत असते यामुळे या गवारेड्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी ओळी – हळवल येथे नुकसानग्रस्त भागाची पहाणी वनरक्षक पल्लवी दाभाडे पोलीस पाटील प्रकाश गुरव, शेतकरी नामदेव परब, अनंत पवार, रामकृष्ण पवार, विलास गावडे, जगन्नाथ गावडे आदींनी केली.