मसुरे | प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीव ऐवजी लक्षद्विप अशी साद घातली ती देशातील भुरळ पडणारे नितांत रम्य सागरी किनारे व तेथील पर्यटन विकासासाठी. आपल्या महाराष्ट्रालाही सुंदर, समृद्ध स्वर्गीय सागरी किनारा लाभला आहे या ठिकाणच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन द्यावे यासाठी सर्व पर्यटन कंपन्यानी विशेष भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे. आपल्या कोकणात अशी अनेक गावे आणि सागरी किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. केवळ तारकर्ली, गणपती पुळे, मुरुड जंजिरा, दिवे आगार, अलिबागच नव्हे तर भांडारपुळे असो की भोगवे, वेणेश्वर, अंजर्ली, दाभोळी, देवगड, कोंडुरा, कळशी , रेवदांडा, असे अविस्मरणीय अनुभव देणारे अनेक सागर किनारे आहेत. महाराष्ट्रातील व देशातील पर्यटकांनी आवर्जून अनुभवण्यासारख्या या सागर किनाऱ्यांना जरूर भेटी द्याव्या आणि कोकणातील व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.
कोकण विभाग हायवे रेल्वे विमान वाहतूक व जल वाहतुकीने संपूर्ण देशाशी जोडला गेलेला असल्याने केवळ आपण स्वतः न जाता आपल्या वर्तुळातील सर्व देशपरदेशातील प्रतिनिधी आणि मित्रमंडळी या नितांत रम्य सागर किनारी जातील यासाठीही प्रयत्नशील रहावे असेही त्यांनी सांगितले. राज्यातील एकूणच पर्यटनाला सतत प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र चेंबर गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही चेंबर प्रयत्नशील आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांनी कोकण किनारी जास्तीतजास्त पर्यटक येतील आणि खास करून काहीशा दुर्लक्षित सागर किनाऱ्यावरील पर्यटन वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. यादृष्टीने महाराष्ट्र चेंबरने हा विषय प्राधान्याने हाती घेतला असून त्याबाबत संबंधितांनी चेंबरशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.
देश विदेशी पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणजे गोवा राज्य. गोवा राज्याला लागूनच आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे गोव्यात येणारा पर्यटक सिंधुदुर्ग कडे वळविणे सहज शक्य आहे. वातावरण आणि निसर्ग सौंदर्य गोव्याच्या तोडीस तोड असल्याने पर्यटक सुद्धा व्यापक प्रमाणात मार्केटिंग झाल्यास इकडे वळतील असे मत पर्यटन या विषयात डॉक्टरेट मिळविलेल्या व मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉ डॉ. श्रीकृष्ण उर्फ दिपक परब यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा काही किमी अंतरावर असल्याने पर्यटकांचा ओघ निश्चितच राहणार आहे. पर्यटनासाठी आवश्यक प्राथमिक सुविधा या ठिकाणी उभारल्या गेल्या असून मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे असे मत श्री परब यांनी व्यक्त केले आहे.