मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या न्हावेली येथील रहिवासी व जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा पेंढर्याची वाडी, पेंडूर ( तालुका – वेंगुर्ले ) येथील समाजसेवाभावी व्यक्तिमत्व, कृषी तसेच पर्यावरण अभ्यासक, सांस्कृतिक सक्रीय व उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथा माला मालवणचा जी. टी. गांवकर सेवामयी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ७ जानेवारीला आचरा हायस्कूल येथे सौ. देवयानी त्रिंबक आजगांवकर यांचा हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर हडप , निवड समितीचे अध्यक्ष सदानंद कांबळी , साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरूजी व मान्यवर तसेच पेंढरेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरी फटनाईक, कथामाला सचिव सुगंधा गुरव तसेच मागील ९ वर्षातील पुरस्कार विजेते मान्यवर ,को. म. सा. प. सदस्य, कथामाला सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, आणि जिल्हा भरातील साने गुरुजी कथा माला तसेच कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर व पदाधिकारी आणि ८५वर्षीय दत्तात्रेय शिवराम हिर्लेकर गुरूजी आपल्या कुटुंबीयासोबत उपस्थित होते.
पुरस्कार मूर्ती सौ. देवयानी आजगांवकर यांच्या सेवेची पहिल्या शाळेच्या मुटाट पाळेकर वाडीची विद्यार्थीनी प्रणाली पाळेकर/सावंत, मातोंड बांबर क्र. ५ ची भक्ती वाटवे – पुराणिक, सध्याच्या शाळेची विद्यार्थिनी साईशा फटनाइक तसेच शाळेतील दोन्ही शिक्षक श्री. तेंडोलकर आणि श्री काळोजी, आजगांवकर कुटुंबीय, मातोश्री रत्नप्रभा गावडे यांच्या उपस्थितीत शाल , श्रीफळ, सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व ५०००/_ रुपये देऊन मुख्याध्यापिका सौ. देवयानी आजगांवकर यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण कोचरेकर यांनी केले आणि आभार विजय चौकेकर यांनी मानले. सन्मान चिन्ह वाचन मधुरा यांनी केले. कार्यक्रम अध्यक्ष अध्यक्ष श्री. हडप , सुरेश ठाकूर, अनन्या पुराणीक व साईशा फटनाईक या विद्यार्थ्यांनी तसेच मुकुंद काळोजी या सहकारी शिक्षकांनी तसेच कुटुंबीयांच्या वतीने बाईंचे यजमान श्री त्रिंबक अंकुश आजगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच निवड समितीचे अध्यक्ष श्री सदानंद कांबळी तसेच जीटी गावकर यांचे कुटुंबीय गांवकर सर हे प्राथमिक स्वरूपाने देवयानी आजगावकर यांच्या विषयी बोलताना सौ. देवयानी आजगांवकर यांच्या ३५ वर्षे शैक्षणिक सेवेचा, समाजसेवेचा व सांस्कृतिक योगदानाचा आढावा घेतला. मॅडमच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून अभिनंदन केले.
हिर्लेकर गुरुजी यांनी शाल व श्रीफळ देऊन वैयक्तिक सत्कार केला. तसेच छोट्या विद्यार्थिनीच्या संभाषणावर प्रभावित होवून कुमारी साईशा फटनाईक हिला विशेष सन्मानित केले. मुख्याध्यापिका सौ. देवयानी आजगांवकर यांची या पुरस्कार प्राप्तीसाठी जिल्ह्यातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.