मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले श्री भालचंद्र उर्फ बबलू राऊत हे गेली २५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योगजकता व माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या सखोल सर्वंकष सामाजिक अभ्यासासह सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील एक समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत. प्रणालीकृत कार्यपद्धती ही खासीयत असलेल्या भालचंद्र राऊत यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विविध चळवळींमध्ये क्रियाशील राहून स्वतःसोबत अनेकांना सामाजिक मंच उपलब्ध करून देण्यासाठीही अथक परिश्रम घेतले. काल ३ जानेवारीला भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणीमध्ये मालवण येथील भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांची सेवाभावी संस्था (एनजीओ) सेलच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा बँक संचालक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते राऊत यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भालचंद्र राऊत हे मागील अनेक वर्षे विविध सामाजिक संस्थांशी संलग्न आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमधून त्यांचा सक्रीय सहभाग असतो. संपुर्ण कोकणात अनेक संस्था, संघटनाना एकत्रित करण्याचे काम मागील काही कालावधीत त्यांनी कोकण एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी केले असून फेडरेशनचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम बघत आहेत. नुकतेच कुडाळ येथे त्यांनी विविध एनजीओंचे एकत्रिकरण करत भव्य एनजीओ समेट भरवला होता, ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहुन अधिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यातील काही संस्थांना सोबत घेत गावपातळीवर अर्थकारण सक्षम व्हावे, पर्यावरण समृद्ध गाव रहावे, कोकणमधील वैशिष्ट्यपूर्ण कोकण गिड्डी गाईंचा मूळ वंश संवर्धित रहावा यासाठी गोमय उत्पादन निर्मिती व विक्री शिबिरे भरवत त्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी, तसेच कोकणातील दर्जेदार मसाल्यांच्या उत्पादक महिला गटांना प्रोत्साहन देत त्यांची मसाला उत्पादने बाजारात आणण्यासाठी आघाडी घेतली आहे. सद्गुरू माऊली संप्रदायाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मदतीचा हात ठरला आहे. युवकांना अचूक जीवन दिशा मार्गदर्शन व रोजगार निर्मितीच्या प्रकल्पांचा त्यांचा अभ्यास आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एनजीओना त्यांचे कार्य व विविध उपक्रमात गती आणि शक्ती मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे एनजीओ सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक भालचंद्र राऊत यांनी या निमित्ताने म्हंटले आहे. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांच्या निवडीनंतर त्यांचे मालवण तालुका, मालवण शहर, सिंधुदुर्ग जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या सर्व क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.