मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य व समस्त मराठी भाषिकांसाठी एक ऐतिहासिक आनंदाची, अभिमानाची आणि अस्मितेच्या अस्तित्वाला सक्षम करणारी पर्वणी आता अनुभवता येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ऋधिपूर या नगरीत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचा शेवटचा टप्पा म्हणजे विद्यापीठनिर्मितीचा कायदा विधानमंडळात संमत करून घेणे. विधिमंडळात हा ठराव मांडला व तो अर्थातच संमत झाला. राज्याच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना मानावी लागेल.
हे विद्यापीठ ऋधिपूर इथे असायचे कारण म्हणजे महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पंथ होय. त्याचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांना मराठी भाषेचा उत्कट अभिमान होता. महाराष्ट्राविषयी विलक्षण आस्था होती. ‘महाराष्ट्री असावी’ हा त्यांचा पंथीयांना आदेशच होता. त्याचप्रमाणं धर्माच्या उपदेशाची भाषाही मराठी असली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या पश्चात पंथीयांनी या आदेशाचं पालन केलं हे वेगळं सांगायला नकोच. श्री चक्रधरांनी ‘उत्तरापंथे गमन’ केल्यानंतर आपल्या शिष्यांना ऋधिपूर इथं, त्यांना स्वतःला गुरुस्थानी असलेल्या श्रीगोविंदप्रभूंच्या आश्रयानं वास्तव्य करण्यास सांगितलं. त्यांची ही आज्ञाही शिष्यांनी पाळली. या वास्तव्याच्या काळात मराठीतील आद्य गद्य ग्रंथ लिळाचरित्राची निर्मिती झाली आणि त्यानंतरही तिथं ग्रंथनिर्मिती होतच राहिली. महानुभावांचे हे ग्रंथ मराठी भाषेसाठी भूषणावह आहेत; म्हणजेच ऋधिपूर हे मराठी ग्रंथलेखनाचं पहिलं केंद्र ठरतं. त्यामुळं मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ तिथं उभारलं जाणं ही अत्यंत स्वाभाविक बाब होय. विशेष म्हणजे हे वर्ष श्रीचक्रधरांच्या जयंतीची अष्टशताब्दी आहे.
वस्तुतः मराठीचं स्वतंत्र विद्यापीठ हवं ही मागणी फार जुनी आहे. ब्रिटिश अमदानीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस राजारामशास्त्री भागवत यांनी स्वतंत्र मराठी विद्यापीठाची केवळ कल्पनाच मांडली असं नाही, तर त्याचा एक प्रारूपवजा आराखडाही तयार केला होता. तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळं बडोदा, ग्वाल्हेर आणि या मराठी संस्थानांच्या अधिपतींना त्यांनी हे महाविद्यापीठ उभारून त्या-त्या संस्थानांमध्ये त्याची केंद्र असावीत, तसंच संस्थानाचे राजे हे स्वतःच कुलगुरू असावेत, असेही त्यांनी सुचविलं होतं. त्यानंतर इतिहासाचार्य वि. वा. राजवाडे यांनीही मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन होण्यासाठी मराठी विद्यापीठ स्थापन करायची गरज प्रतिपादन केली. पुढील काळात जेव्हा पुणे येथे विद्यापीठ स्थापन होईल,
तेव्हा तेच मराठीचे विद्यापीठ असेल अशी अनेकांची कल्पना व अपेक्षा होती. तथापि, वरीलपैकी कोणतीही कल्पना प्रत्यक्षात उतरली नाही. दरम्यानच्या काळात अनेक मान्यवरांनी त्यासाठी आग्रह धरला, संस्थांनी, संमेलनांनी तसे ठरावही केले. महानुभाव सांप्रदायिकांचीही तशी मागणी होतीच. या सर्व खटपटींना यश मिळण्याचा योग याच महिन्यात जुळून आला. राज्य सरकारनं तसा निर्णय घेऊन त्यासाठी एका समितीचं गठन केले. योगायोगानं मला त्या समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली व मुख्य म्हणजे कार्यक्षम सहकारीही लाभले.
त्यांच्या सहकार्याने समितीनं विद्यापीठाचा अहवाल सादर करण्याचे काम युद्धपातळीवरील म्हणता येईल अशा गतीनं दोन महिन्यांमध्ये पार पाडलं. शासनाच्या उच्च शिक्षण विभागानं त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाने त्यासाठी वेळोवेळी अपेक्षित मदतही केली. या सर्वांचे मनापासून आभार.
अठराव्या शतकात मराठ्यांनी स्वपराक्रमानं संपूर्ण भारत व्यापला होता. त्यामुळं मराठी भाषेचा फैलावही भारतभर होऊ लागला होता. इतकंच काय परंतु मराठ्यांचं राज्य सर्व भारतभर होईल असा रंगही दिसत होता.
तथापि, कालचक्र अशा प्रकारे फिरले, की संपूर्ण भारतच इंग्रजांच्या सत्तेखाली गेला. स्वाभाविकपणे मराठी भाषेच्या विकास व विस्तारावरही त्याचा परिणाम झाला. १९४७ मध्ये भारत देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला.
भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार, चळवळ करून का होईना १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यानंतर मराठीला योग्य ती प्रतिष्ठा मिळावी, तिची अभिव्यक्तिक्षमता वाढावी, ती राजभाषा, ज्ञानभाषा व कर्मभाषा व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा होती. त्यासाठी काही प्रयत्नही झाले. तथापि, त्यांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही.
वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. इतकेच नव्हे, तर कार्यरत असलेल्या साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा सल्लागार समिती, राज्य मराठी विकास संस्था अशा संस्था व त्यांचे समायोजन करणाऱ्या स्वतंत्र मराठी भाषा विभागाचे खाते यांचे प्रयत्नही पुरेसे ठरत नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करू शकणाऱ्या स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता सरकारच्या लक्षात आली आणि उचित निर्णयापर्यंत सरकार आलं व त्याची अंमलबजावणी झाली.
संकल्पित विद्यापीठाचे स्वरूप हे अर्थातच आंतरविद्याशाखीय राहणार आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्रातील माणसे आणि अर्थातच त्याची मराठी भाषा यांचा अभ्यास देशाच्या आणि जगाच्या पातळीवर करणे आणि त्यांच्या अभ्युदयासाठी साह्यभूत होणे असा या विद्यापीठाचा व्यापक उद्देश आहे.
महाराष्ट्र नेमका काय आहे, कसा आहे, त्याची सांस्कृतिक जडणघडण कशी घडली, त्याचे देशाला व जगाला काय योगदान आहे व भविष्यातही असू शकेल, याची नेमकी स्पष्टता यावी यासाठी विद्यापीठात महाराष्ट्र विद्या हा स्वतंत्र अभ्यासक्रम समाविष्ट केला गेला आहे.
प्राचीन काळात संस्कृत आणि महाराष्ट्री प्राकृत यांच्यातील देवाणघेवाणीतून मराठी भाषा कशी उत्क्रांत होत गेली, मध्ययुगात तिचा अरबी-फारसीशी संबंध येऊन तिच्यात काय परिवर्तनं झाली, हे समजून प्रादेशिक भाषेच्या अध्ययन संशोधनाची तरतूद विद्यापीठात केली जाणार आहे.
या सर्व भाषा आणि परकीय भाषा यांच्यातील सेतू बांधण्यासाठी अनुवादविद्येला प्राधान्य द्यायला हवे, तसेच अर्वाचीन काळात ब्रिटिश सत्ता भारतात स्थापन झाल्यानंतर मराठी आणि इंग्रजी यांचा संबंध येऊन इंग्रजीद्वारे येणारे ज्ञानविज्ञान येथील लोकांनी कसं आत्मसात केलं, त्याचा मराठी भाषेवर काय परिणाम झाला याचा अभ्यासही गरजेचा आहे.
भूतकालीन कर्तृत्वाचं आणि योगदानाचं काम आवश्यक असलं आणि त्याचा रास्त अभिमान बाळगण्यात काही गैर नसले, तरी भूतकाळाचे पोवाडे गाऊन वर्तमानात तग धरता येत नाही व भविष्यही घडवता येत नाही.
आपल्या सांस्कृतिक व सामाजिक स्वत्वाचं रक्षण करण्यासाठी आपला वारसा आत्मसात करणं जरूर असले, तरी त्याचं स्वरूप स्मरणरंजनात्मक असता कामा नये. आपण वर्तमानात वावरतो व आपल्याला भविष्य घडवायचं आहे हे लक्षात घेऊन मराठी भाषेच्या जगातील सर्व प्रकारचे आधुनिक ज्ञानविज्ञानाचे प्रकार आत्मसात करायला हवेत व ते शक्य व्हावे यासाठी आपली भाषा सक्षम करणे टाळता येणार नाही.
चक्रधर-ज्ञानदेवांच्या काळात संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि धर्मचर्चा पेलण्याइतपत मराठी सक्षम व समृद्ध झाली. त्यामुळे तिच्या आधारे आपण त्यानंतर झालेल्या दोन सांस्कृतिक आक्रमणांचा यशस्वी मुकाबला करू शकलो याला इतिहासाची साक्ष आहे.
बदलत्या परिस्थितीत परिवर्तनाला आक्रमण म्हणता येणार नाही. विशेषतः १९९० च्या दशकापासून जगाच्या पाठीवर जे आर्थिक बदल होत आहेत व ज्यांना तंत्रज्ञानाने अपरिहार्य केले आहे, त्यांना सामोरे जाताना भाषा हे पहिले उपलब्ध हत्यार आहे.
त्यासाठी भाषेचं रक्षण करायला हवं. पूर्वीच्या काळी ‘धर्मो रक्षति रक्षितः’ हे जेवढं सत्य होतं, तसं आजच्या काळात ‘भाषा रक्षति रक्षिता’ हे खरं आहे. अर्थात, त्यासाठी व्यापक स्वरूपाचा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषेचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या स्वतंत्र व एकल विद्यापीठाची नितांत गरज होती.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळं आपली इच्छा असो वा नसो, आज कोणालाही अलिप्त राहता येणार नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही. जागतिकीकरणाचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या जगण्यावर होत आहे.
जगण्याची पद्धती, तसेच जगण्याची साधनं उपलब्ध करण्याचे मार्ग यांच्यात विलक्षण वेगानं बदल होत आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषेतून शिक्षण, रोजगार व व्यवसाय यांच्यासाठी योग्य नाही असे समजून त्यासाठी परकीय भाषांचा विशेषतः इंग्रजीचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती आपल्यात बळावत चालल्याचे दिसतं.
याच्यावर उपाय म्हणजे या भाषांना दूर ठेवणं हा नसून आपल्या भाषेला त्यांच्याइतकं सक्षम करून त्यांच्या पातळीवर नेऊन पोचविणं हा आहे. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हा मुद्दा केवळ भाषेचा, कोशनिर्मिती वगैरे करण्याचा नाही. ते आवश्यक असले, तरी पुरेसे नाही. मराठी माणसाने आपल्या कर्माची व्याप्ती वाढवली तरच हे शक्य होईल.
जसा तुमच्या कर्माचा विस्तार होतो तसाच तुमच्या भाषेचाही विस्तार होतो. कारण कर्म करताना भाषेचा उपयोग करावा लागतोच. म्हणून तर आपली भाषा आपल्या कर्माच्या मागं पडता कामा नये. ती मागं राहिली तर कर्मासाठी सक्षम असलेल्या अन्य भाषेचा आधार घ्यावा लागतो आणि मोठ्या प्रमाणात भाषिक अनुशेष निर्माण होतो.
म्हणून तर भाषेला कर्माशी जोडून घ्यायची गरज आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवूनच विद्यापीठाची रचना होणार आहे. तशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची शिफारसही करण्यात आली आहे. व्यवस्थापन, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान गृहीत धरूनच हे करण्यात आले आहे.
भाषेचा अत्याधुनिक पद्धतीनं अभ्यास करून तिच्यात अनुस्यूत असलेल्या क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा विकास करणं हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी पारंपरिक भाषाविज्ञान, ‘कॉम्प्युटेशनल’ भाषाविज्ञान, भाषा अभियांत्रिकी अशा आधुनिक विषयांचं शिक्षण इथं देण्यात येईल.
त्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत भाषा प्रयोगशाळेची (Language Laboratory) उभारणी करण्यात येईल. ‘मराठी भाषकांची विवेकशीलता, रचनाशीलता, उपक्रमक्षमता आणि नवनिर्माणक्षमता वाढवण्यासाठी भाषिक आयुधांची व साधनस्रोतांची निर्मिती करणारे विद्यापीठ अशी त्याची ओळख असेल. याबरोबरच मराठींच्या बोलींकडं विशेष लक्ष देऊन त्यांनाही सक्षम करण्यासाठी त्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या जातील.
अठराव्या शतकातील मराठ्यांच्या पराक्रमामुळं भारतभर मराठी संस्थानं निर्माण होऊ शकली. या सर्वांच्या समुच्चयाला आपण बृहन्महाराष्ट्र म्हणतो. या बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे भाषिक प्रश्न काय आहेत ते समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठीही विद्यापीठ कार्यरत राहील. तेथील संस्था व विद्यापीठं यांच्याशी योग्य ते करारमदार केले जातील.
गेल्या काही दशकांत परदेशांत जाऊन स्थायिक होणाऱ्या मराठी माणसांचे प्रमाण वाढले आहे. परदेशांमधील काही विद्यापीठांमध्ये तर मराठी भाषेची अध्यापन केंद्रेही आहेत. या विद्यापीठांशी व मराठी माणसांशी संपर्क व संबंध प्रस्तावित करून त्यांना मदत करण्याचे प्रयत्नही या विद्यापीठाकडून होणार आहेत.
त्यांना औपचारिक व पद्धतशीर स्वरूप देण्यासाठी योग्य असे करार केले जातील. त्यात परस्पर देवाणघेवाणीचे कलमही असेल. आवश्यकतेनुसार मराठीसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांना संलग्नता देऊन एकीकडं त्यांचे साह्य घेणं व दुसरीकडं त्यांचे हात बळकट करणं हाही विद्यापीठाचा एक महत्त्वाचा उपक्रम राहणार आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास १) मराठीचं भाषिक भांडार व मराठी भाषेच्या उपाययोजनांची कक्षा वाढवणे. २) ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रांत मराठी भाषेचा सक्षम वापर वाढवण्यासाठी विचारांचं व्याकरण प्रवर्तित करणे, संकल्पनाकोशांची निर्मिती करणे.
३) ग्रामीण व आदिवासी बोलीक्षेत्रांतील भाषिक तूट भरून काढण्यासाठी कृतिकार्यक्रम राबवणे. ४) विविध भारतीय व विश्वभाषांतील मराठीच्या आदानप्रदानाचा क्षेत्रविस्तार करणे. द्वैभाषिक/ बहुभाषिक अध्ययन कौशल्यं, भाषांतर कौशल्यं यांचा विकास करणे.
५) संगणकीय भाषिक संसाधनांची निर्मिती करणे, ज्ञानसंपादन व रोजगारनिर्मितीसाठी संसाधनांच्या उपयोजन कौशल्यांचे शिक्षण, प्रशिक्षण करणे व डिजिटल मराठी भाषक समाजाची जडणघडण करून नवं सार्वजनिक संवादविश्व उभे करण्यासाठी ज्ञानात्मक अधिष्ठान तयार करणे.
६) महाराष्ट्राच्या प्रादेशिक बोलींचा, लोकविद्या, लोकसाहित्य, लोकसंस्कृतींचा अभ्यास करणं. ७) बृहन्महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात मराठी भाषा व संस्कृतीच्या शिक्षण, संशोधन व विस्तारसेवा प्रकल्पांना साह्य करणे.
८) पारंपरिक भाषिक- वाङ्मयीन – सांस्कृतिक वारशाची आधुनिक ज्ञानविज्ञान तंत्रज्ञानाशी सांगड घालणारे अभ्यासक्रम व शोधप्रकल्प विकसित करणे अशी या विद्यापीठाची उद्दिष्टं आहेत. श्री चक्रधरस्वामींच्या जन्माची अष्टशताब्दी वर्ष,
श्री ज्ञानेश्वरांच्या जन्माचं सातशे पन्नासावं वर्ष, तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक समारंभाचं तीनशे पन्नासावं वर्ष असलेल्या या कालखंडात ‘लिळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘राज्य व्यवहार कोश’ या ग्रंथांचं स्मरण ठेवीत मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यात सरकारनं औचित्य साधलंय.