ऋण जनसंपर्क अभियाना अंतर्गत कणकवलीत विविध योजनां बाबत मार्गदर्शन
कणकवली | उमेश परब : बँकांच्या माध्यमातून विविध योजना समजाव्यात, यासाठी बँका आता ग्रामीण भागात पोहचल्या पाहिजेत. येणारा काळ हा पर्यटनाचा असणार आहे. त्यामुळे याकडे सर्वच बँकांनी लक्ष द्यावे असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. जिल्हा अग्रणी व्यवस्थापक सिंधुदुर्ग व बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रेडिट आउटरिच (ऋण जनसंपर्क अभियान ) मेळाव्याचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. यावेळी एरिया मॅनेजर आर.डी. कुजूर, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर परशुराम गावडे, बँक ऑफ इंडिया वरिष्ठ अधिकारी नंदकुमार प्रभुदेसाई, स्टार कृषि सेवा केंद्राचे ऋषिकेश गावडे,जिल्ह्यातील विविध बँकांचे शाखाधिकारी, कर्मचारी, उद्योजक , ग्राहक आदि उपस्थित होते. यात कृषि कर्ज योजना ,अनेक सुरक्षा योजना ,सूक्ष्म लघु उद्योग कर्ज योजना, विविध सरकारी प्रायोजित योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे परशुराम गावडे यांनी उद्योग क्षेत्रातील विविध योजनांचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी विविध लाभार्थ्यांना ऋण मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या मोहिमेमध्ये कणकवलीतील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ बडोदा, युको बँक ,यूनियन बँक , बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट को. बँक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.