मनसे मालवण तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे आणि माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी एस टी अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे मालवण तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे आणि माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी मालवण एस टी अधिकाऱ्यांना भेटून प्रवाशांच्या विविध समस्या व तक्रारी यांसाठी काल १७ डिसेंबरला, दुपारी १२ वाजता एस टी स्थानक येथील कार्यालयात जाऊन धारेवर धरले. मनसे तर्फे एस टी प्रवाश्यांच्या गैरसोयींबाबत दखल घेताना या गैरसोयी व तक्रारी यांचे निराकरण करून वेळेतच त्या समस्यांचा निकाल लावला नाही तर प्रवाशांच्या कल्याणासाठी ‘मनसे’ पद्धत वापरली जाईल असा स्पष्ट इशारा देखील मनसे तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे आणि माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
देवली -आंबेरी एस टी बस वेळेत न मार्गस्थ होणे याबाबत तत्काळ कार्यवाही करणे तसेच नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे, चौकशीसाठी केलेला फोन एंगेज यावा म्हणून तो काढून बाजुला ठेवणे अशा स्वरुपाच्या गोष्टी घडू नयेत व पुन्हा तक्रारी येऊ नयेत याची काळजी एस टी अधिकारी व प्रशासन यांनी घ्यावी असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे आणि माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर दिला आहे. या गोष्टींचा निकाल न लागल्यास मनसे पद्धत वापरली जाईल व त्याला एस टी महामंडळ प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.