मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात आयोजीत होणारी व प्रतिष्ठेची मानली जाणारी इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत टेबल टेनीस स्पर्धेचे काल `१६ डिसेंबरला उद्घाटन झाले १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिगंबर सामंत यांच्या हस्ते झाले. हा उद्घाटन समारंभ जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिसच्या खेळाडूंना संधी मिळावी आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवणमध्ये दरवर्षी आयोजित केली जाते. इंडियन आईल लिमिटेडने क्रीडा व क्रीडापटूंना नेहमीच भरघोस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. मालवण, कणकवली, देवगड, सावंतवाडी या ठिकाणी समर स्पोर्ट्स कॅम्पचेही आयोजन केले जाते.
या कॅम्पमध्ये बॅडमिंटन, कॅरम, ब्रिज, टेबल टेनिस,चेस, क्रिकेट या खेळांचे दिग्गज क्रीडापटूंकडून कोचिंग केले जाते. भारतातील तरुण-तरुणींमध्ये जे क्रीडा कौशल्य आहे, ते जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना अचूक मार्गदर्शन व संधी देणे हे फार महत्त्वाचे आहे.आणि त्यासाठी इंडियन आईल नेहमीच प्रयत्नशील असते.२०१८ सालापासून कोरोनाची दोन वर्षे सोडली तर दरवर्षी इंडियन आईल मालवणमध्ये टेबल टेनिस स्पर्धा पुरस्कृत करते. राष्ट्रीय खेळाडू कांचन बसाक आणि रिच रिशा यांचे प्रशिक्षण फलश्रुती म्हणून मालवणातील मुले राज्यस्तरीय स्पर्धेत आपला ठसा उमटवीत आहेत.
या वर्षी प्रथमच ही टेबल टेनिस स्पर्धा टीम लीग पद्धतीने घेण्यात येत आहे. शिवाय महिला/पुरुष एकेरी आणि दुहेरी, १५ वर्षांखालील मुले-मुलींचा गट, तसेच शिकाऊ मुला-मुलींच्या गटातसुद्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी डॉ. राहुल पंतवालावलकर,तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष – विष्णू कोरगावकर, सचिव- हेमंत वालकर, शुभम मुळीक, सौ. मेघना वारंग, तसेच स्पर्धक, पालक व टेबल टेनिसचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी व आभार विष्णू कोरगावकर यांनी मानले.