मुंबई | ब्यूरो न्यूज : मराठी व हिंदी सिनेमा व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते.
रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले. मात्र उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पाठी पत्नी, दोन मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे यांनी एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते. तर हिंदीत सिंघम, नायक सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. रवींद्र बेर्डे हे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे थोरले बंधू होत.