मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथे आज ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ यांच्यातर्फे आयोजित कोकण चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन ‘मत्स्यगंधा समर्थ थिएटर’ मध्ये माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्या आधी तारकर्ली बंदर येथून देवबाग मत्स्यगंधा समर्थ थिएटर पर्यंत शाळकरी मुलांच्या पौराणिक वेशभूषा, लेझीम पथक व नटराजाची पालखी यांच्या साथीने चित्रपट महोत्सव दिंडी काढण्यात आली.
उदघाट्न कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर, सचिव विजय राणे, वेतोबा मालिका फेम अभिनेते उमाकांत पाटील, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगांवकर, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, देवली सरपंच शाम वाक्कर, तारकर्ली पर्यटन संस्था संस्थापक रवींद्र खानविलकर, बाबा कांदळगावकर व मान्यवर उपास्थित होते.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांसह सिनेमा सृष्टी, नाट्य, दशावतार व कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या जीजी चोडणेकर, भार्गव लोंढे, नमिता गांवकर, निर्मला टिकम, सीताकांत तांडेल, प्रदीप वेंगुर्लेकर, गजानन मांजरेकर, रतिलाल तारी, भालचंद्र केळूसकर, संतोष बांदेकर, विलास वालावलकर, बाबा कांदळगावकर, कु. श्लोक सामंत यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलाकारांची कमी नाही. येथील कलाकारांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असून कलाकारांना पुढे आणण्यासाठी व पाठबळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अभिनेते विजय पाटकर म्हणाले, सिंधु कला आणि सिंधु रत्नांना वाव मिळावा यासाठीच आपण हा चित्रपट महोत्सव सिंधुदुर्गात आयोजित करत आहोत. जिल्ह्याला सुंदर निसर्ग लाभला असून देवबाग हे मॉरीशस पेक्षाही सुंदर आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी सिंधुदुर्गामधील मंडळी आमच्या सोबत आहेत, असेही पाटकर म्हणाले. सूत्रसंचालन रुपेश खोबरेकर व गजानन मांजरेकर यांनी केले.