आज रविवारी होत आहे समारोप …! “महिला आत्मनिर्भरतेचा” कौतुकास्पद सोहळा…
ब्यूरो न्यूज | विवेक परब : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई तेरसे यांनी यंदा दिवाळीपूर्वी कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये एक नवीन उपक्रम घडवून आणला. जिल्ह्यातील जवळपास चाळीस महिला बचत गटांच्या विविध उद्योगांना एकाच ठिकाणी प्रदर्शन आणि विक्रीची संधी उपलब्ध करून दिली. या स्टॉल्सना लोकांकडूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि दिवाळीपूर्वीच महालक्ष्मी हॉल लखलखला. विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महिलांच्या घरीही महालक्ष्मी हॉलमधून लक्ष्मीने प्रवेश केला. नरेंद्र मोदींच्या मनातल्या “आत्मनिर्भर भारता”कडे महिलांना नेण्याच्या संध्याताईंच्या या प्रयत्नांना खरोखरच दाद द्यावी लागेल. या राजकीय व्यासपीठावरचा उपक्रम नसला तरी संध्याताई या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या महिला विद्यमान जिल्हाध्यक्षही आहेत. म्हणूनच पक्षविचार जपत नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठीचे त्यांचे हे पाऊल तितकेच स्तुत्य मानले पाहिजे असे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. आज रविवारी या खरेदी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी उदघाटन करताना या उपक्रमाची मनापासून प्रशंसा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील आर्थिक संकटात हे पाऊल खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी केवळ औपचारिक उदघाटन केले नाही, तर प्रत्येक स्टॉलवर जाऊन महिला उद्योजकांशी संवाद साधत व्यवसायाची माहिती घेतली. महिलांचे आत्मबळ वाढवणारी ही त्यांची कृती होती.जिल्ह्यातील विविध चाळीस स्टॉल्स या दिवाळी खरेदी महोत्सवात सहभागी झाले आहेत. दिवाळीच्या रंगीत पणत्या, रंगीबेरंगी आकर्षक आकाशकंदील, सजावटीचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, दिवाळीसाठी फराळ, गृहोपयोगी वस्तू, मालवणी मसाले, साड्या, ड्रेस मटेरियल, आर्टिफिशल ज्वेलरी, बॅग्स, गिफ्ट आर्टिकल्स, बांबूपासून बनवलेले अतिशय वेगवेगळे शोपीस, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खूप सुंदर सुंदर वस्तूंच्या या जत्रेला नक्कीच भेट द्यायला हरकत नाही. याठिकाणी महिलांना केवळ स्टॉल्स उपलब्ध करून केवळ अर्थकारण पाहिले नाही, तर महिला उद्योजिकांना व्यवसाय व्यवस्थापन व विक्री कौशल्य या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली जेणेकरून भविष्यात त्यांना आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे वाढवता येईल. बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांचेही विशेष कौतुक करावे लागेल की त्यांनी अशा उपक्रमाला पाठबळ दिले. केवळ पाठबळ नव्हे तर त्या ठिकाणी उपस्थित महिला उद्योजकांना कर्ज, त्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. अशा मोठ्या राष्ट्रीयकृत बँका आणि नवउद्योजक महिला यांच्यात योग्य प्रकारे समन्वय राहणे नेहमीच गरजेचे असेल. तो हेतूही या खरेदी मेळाव्यातून साध्य झाला हा या एकूण कार्यक्रमातला माईल स्टोन ठरावा.पुन्हा एकदा नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या मी आत्मनिर्भर घोषवाक्यासह भरवलेल्या खरेदी महोत्सवाचे मनःपूर्वक कौतुक आणि अध्यक्षा सौ संध्याताई तेरसे यांचे अभिनंदन करत अनेकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसाय व उद्योग अभ्यासक श्री अविनाश पराडकर यांनी या प्रकल्पाचे खास जाहीर कौतुक केले आहे.