मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथील मंदार रघुनाथ पटवर्धन यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे अल्पशः आजाराने रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
कांदळगांव येथील मंदार पटवर्धन हे पुरोहित म्हणून कार्यरत होते आणि काही काळ त्यांनी पत्रकारिताही केली होती. ते मनमिळावू, सर्वसमावेशक आणि हसतमुख स्वभावाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. आज कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, बहीण, भावोजी असा परिवार आहे. कांदळगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कांदळगांव ग्रामस्थांच्या वतीने पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना उमेश कोदे म्हणाले, गांवच्या धार्मिक तसेच सामाजिक कार्यात मंदार पटवर्धन यांचा सहभाग असायचा लहान वयात त्यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक माणसे जोडली होती मंदार हे त्यांच्या परिवाराचा मुख्य आधार होते त्यांच्या निधनामुळे आपण समाजातील एका चांगल्या व्यक्तीला मुकलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्राह्मण समाज, विविध क्षेत्रांतील व्यक्ती व समूहांनी मंदार पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.