अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे पुरस्कार जाहीर ..
आचरा | विवेक परब : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा थोर शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षण पुरस्कार देवगड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, चाफेड भोगलेवाडी शाळेच्या शिक्षिका श्रीम. रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण ९ जानेवारी २०२२ रोजी चाफेड भोगलेवाडी शाळेच्या प्रांगणात मा. प्रजापती थोरात (गटशिक्षणाधिकारी पं.स. देवगड) आणि सन्माननीय साने गुरुजी कथामाला कार्यकारीणी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फार मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार थोर शिक्षणतज्ञ आदरणीय जी. टी. गावकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येतो. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र अश्या प्रकारे पुरस्काराचे स्वरुप असून दरवर्षी निवड समितीमार्फत शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रिडाविषयक आदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करुन सदर पुरस्कारासाठी निवड होते. त्यात शिक्षकांचे कथामालेचे कार्य आणि बही:शाल शिक्षणाचे कार्य यांचे मूल्यमापन समिती मार्फत केले जाते.
सदर पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सदानंद मनोहर कांबळी यांनी काल याबाबतची अधिकृत घोषणा केली.
श्रीम. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी गेले पाव शतक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवा बजावित असताना विविध शैक्षणिक उपक्रमांतून शाळा घराघरांत कशी जाईल आणि मुलांचे घर शाळेत कसे येईल याबाबत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळेत सेवा बजावित असताना वंचित घटकांसाठी तसेच शिष्यवृत्ती, क्रीडा, साहित्य, संस्कृती आदीबाबत बालकांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे.
अ. भा. साने गुरुजी कथामाला मासिकाने त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर यांच्या नावाचा पुरस्कार रश्मी रामचंद्र आंगणे ह्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शिक्षिकेला मिळणे ही रश्मी आंगणे यांच्या पाव शतकाच्या निरलस शैक्षणिक सेवेची पोचपावती आहे.”*
रश्मी रामचंद्र आंगणे यांचे ह्या सेवामयी शिक्षण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.