श्री मनोज रावराणे यांनी सिद्धीला घेतले दत्तक तर श्री राजन चिके यांनी उचलली पंधरावी पर्यंतची शैक्षणिक जबाबदारी…!
कणकवली | उमेश परब : विशेष वृत्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण हे समाजाशी किती बांधलेले असते याची प्रचिती आज पुन्हा एकदा येते आहे. कोरोना आपत्तीपूर्वीही जिल्ह्यातील राजकारणी व्यक्तींचे दातृत्व हे अधोरेखित होतेच परंतु त्यासोबतच आता राजकारणी मंडळीं जे पितृत्व तथा पालकत्व स्विकारुन निराधारांचे जीवन टिकवू पहातायत त्याचीही एक वेगळी प्रचिती सर्वांना येऊ लागली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या व घणाघाती आजारात आपले आई वडील गमावलेल्या घोणसरी येथील अकरावीत शिकणाऱ्या सिद्धी सकपाळ हिच्यासाठी कणकवली सभापती मनोज रावराणे आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके देवदूत बनले आहेत. मनोज रावराणे यांनी तिला दत्तक घेत तिला दर महिना दोन हजार रुपये व वह्या पुस्तकांची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेय. तर राजन चिके यांनी सिद्धीचा पंधरावी पर्यंतचा सर्व खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आई वडील गमावलेल्या सिद्धीला खुप मोठा मायेचा आधार मिळाला आहे. अकरावी मध्ये शिकणाऱ्या सिद्धी सुभाष सकपाळ ह्या मुलीचे आई वडील दोघेही कोरोना काळात मृत्यूमुखी पडले. तिला दोन सख्खे भाऊ आहेत. त्यापैकी मोठा भाऊ अपंग आहे. त्यामुळे शैक्षणिक वाटचाल कशी करायची आणि कुटुंबाचा रहाटगाडा कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न या भावंडांसमोर उभा ठाकला होता. घोणसरी गावचे ग्रा. प. कर्मचारी जेरॉन बारेत यांनी दोन वर्षांपूर्वी सिध्दीच्या मोठ्या भावाला संजय गांधी निराधार योजनेमधून पेन्शन चालू करून दिली होती. त्यामुळे त्याचा थोडा आधार होता. परंतु आई वडील गेल्यानंतर अडचणी अधिक वाढल्या. त्यात आर्थिक अडचणीमुळे सिद्धीच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला. ही बाब लक्षात येताच भाजप तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर व ग्रा. पं. कर्मचारी जेरॉन बारेत यांनी ही सर्व परिस्थिती सभापती मनोज रावराणे यांच्या कानी घातली. त्यांनतर क्षणाचाही विलंब न करता मनोज रावराणे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके हे सिद्धी सकपाळच्या घरी पोहोचले आणि मनोज रावराणे ह्यांनी सिद्धी बरोबर संवाद साधला. तिच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व लगेचच तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तिला दर महिन्याला २००० रु. व वह्या पुस्तक देणार असल्याचेही सांगितले. तसेच राजन चिके यांनी सिद्धी चा १५वी पर्यंतचा खर्च करणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढे शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वासही त्यांनी सिद्धीला दिला. सतत चांगल्या कामामध्ये अग्रेसर व चर्चेत असणाऱ्या कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी सिद्धीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत आणि तिला दत्तक घेत पुन्हा एकदा आपल्या समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. सिद्धी अकरावीत आहे…..नीटशी प्रगल्भही नाही किंवा अगदी लहानश नाही अशा जीवनाच्या टप्प्यावर ती आहे….तिच्या भावंडांसकट ती संकटात आहे हे पाहून “मनोजवं मारुतुतुल्य वेगाने आणि जबाबदार राजनाच्या काळजीने” दोन मदतीचे हात किंवा पितृछत्र हे समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांसाठीच आदर्श ठरले आहेत. सिद्धीच्या शिक्षणाचे कार्य सिद्धीस नेणार्या या दोन नेत्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.