पन्नास वर्षे आत्मनिर्भरता, व्यावसायिक चिकाटी व स्थानिक कौशल्य विकासाचा अथक कृतीतून जागर केलेले व्यक्तिमत्व हरपल्याने जिल्ह्यातून व्यक्त होतोय शोक..!
कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील्या कुडाळ
येथील ज्येष्ठ व्यवसाय तज्ञ व उद्योजक तसेच ओंकार डिलक्स व श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटरचे मालक श्री सुरेश उर्फ बापू नाईक यांचे आज दुपारी निधन झाले. कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील मूळ रहिवासी व कुडाळ एमआयडीसी येथे स्थायिक होते. उद्या सकाळी १० वाजता तेंडोली येथे त्यांच्या गांवी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कुडाळ एमआयडीसी येथे गेली ५० वर्षापूर्वी त्यांनी शाई बनविण्याचा कारखाना सुरू केला. त्यानंतर कुडाळ उद्यमनगर येथे फर्निचर बनविण्याचा कारखाना केला होता. कुडाळ एमआयडीसी येथे ओंकार मंगल कार्यालय , उद्यमनगर येथे ओंकार डिलक्स नावाने मंगल कार्यालय सुरू केले. या व्यवसायात अतिशय मेहनतीने त्यांनी चांगला जम बसविला आणि हा व्यवसाय नावारूपाला आणला. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार राजन नाईक व हॉटेल व्यवसायिक प्रसाद नाईक यांचे ते वडिल होत.