आरक्षणाबाबत ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप.
बीड | ब्यूरो न्यूज : मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलकांचा संयम सुटून ते आक्रमक झाल्याची झळ बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजलगांव येथील आमदार प्रकाश सोळंके यांना आज बसली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आमदार सोळंके यांचे राहते घर पेटवून दिले आहे. ज्यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून अनेक वस्तू भस्मसात झाल्या आहेत. आंदोलकांनी सुरुवातीला आमदारांच्या घराच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बंगल्याच्या दारात पोर्चमध्ये उभी असलेली फॉर्च्युनर कार पेटवून दिली. धक्कादायक म्हणजे या वेळी आमदार सोळंके हे घरातच होते. कारला लागलेली आग पुढे घराराही लागली. दरम्यान, आंदोलक पांगले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आंदोलकांनी फॉर्च्युनर कारला आग लावल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनी मार्फत लाईव्ह प्रक्षेपणात दाखवले. या वेळी आमदार सोळंके यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या मी माझ्या घरातच आहे. काही आंदोलक मला भेटायला आले. त्यांनी आपण समाजाच्या बाजूने उभे राहा असे मला सांगितले. नंतर त्यांनी माझ्या वाहनाला आग लावली. मी मराठा समाजाचाच आमदार आहे. माझा कोणावरही राग नाही. आंदोलकांवरही राग नाही. त्यांना कोणीतरी विरोधक चिथावणी देत आहेत. मला त्या खोलात जायचे नाही. पण आपला कोणावरही राग नसल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले.
पाठिमागच्या दोन दिवसांपासून आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि आंदोलक संतप्त होत आहेत. परिणामी आक्रमक आंदोलकांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली आहे. काही आंदोलकांनी तहसील कार्यालयातील वाहने पेटवली तर काहींनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील आंदोलकांकडून पेटवल्या. दरम्यान, आमदार सोळंके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे समजतेकी, सुरुवातीला २०० ते ३०० जणांचा एक मोठा जमाव सोळंके यांच्या घरावर चाल करुन आला. त्यांनी सुरुवातीला दगडफेक केली. त्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. नंतर ती आग घरालाही लागली.
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सकार कटीबद्ध आहे. या समालाजाल दोन टप्प्यांमध्ये आरक्षण देण्यात येईल. त्यासाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. जो उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी मराठा समाजाने संयम राखावा असेही आवाहन करुन जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पाणी प्यावे असे आवाहन केले.