राकेश परब | विशेष वृत्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बबलू गवस एक सामाजिक संवेदना जाणत उचललेले एक पाऊल दिशादर्शक आहे. सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. त्यातून आनंदही मिळतोच परंतु तो आनंद आणखीन सकारात्मक टिकून वाढावा व उपयुक्त ठरावा म्हणून वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बबलू गवस यांनी त्यांची पत्नी सौ. प्रणाली व मुलगा विराज यांचा वाढदिवस मडुरे येथील अंथरुणाला ३ वर्षे खिळून असलेल्या नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू व खाऊ वाटप केले. महादेव गवस व कुटुंबियांचा हेतू होता की वाढदिवसाला खर्च होणारा पैसा गरजूंसाठी जास्त उपयुक्त ठरेल.
मडुरे रेडकरवाडी येथील नारायण तोरसकर हे गेली ३ वर्षे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांची पत्नी मुकी व बहिरी असून पती आजारी असल्याने त्या मोलमजुरीच्या कामाला जाऊ शकत नाहीत. साहजिकच त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती बबलू गवस यांना मिळताच त्यांनी आपली पत्नी व मुलग्याचा वाढदिवस साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी सदर रकमेतून तोरसकर कुटुंबियांकडे जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी व मुलानेही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. बबलू गवस यांनी मडुरे येथे तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. यावेळी विराज परब, शैलेश गवस, विश्वनाथ नाईक, यशवंत माधव, राकेश परब, प्रवीण परब उपस्थित होते. तोरसकर कुटुंबियांकडून बबलू गवस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“वेदना जाणावयाला जागवू संवेदना”, या काव्यपंक्तींना अनुसरुन महादेव उर्फ बबलू गवस, त्यांची पत्नी व चिरंजीव यांनी ‘सत्कार्याची सुरवात स्वतः पासून करुया’ हा संदेशही नकळत दिला आहे. त्यांच्या या ‘वाढदिवस साजरीकरणाची’ सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

राकेश परब | बांदा प्रतिनिधी .