(संपादकीय विशेष)
मालवण | संपादकीय विशेष : सध्या विविध सामाजीक मंचांवर एक आवाहन पसरताना दिसते आहे ते म्हणजे चिनी फटाके व रोषणाईचे चिनी दिवे यांचा वापर करु नये कारण त्या फटाक्यांनी दमा आणि त्या दिव्यांनी डोळ्यांना त्रास व्हायची शक्यता आहे …आणि हा चिनचाच एक गुप्त डाव आहे.
खाली ‘राष्ट्रीय वरीष्ठ अधिकारी, गृहमंत्रालय’, असाही आवाहन कर्त्यांचा उल्लेख आहे. अर्थात् त्या नावाला कोणतीच अस्सलता वगैरे आपण प्रमाणीत म्हणू शकत नाही आणि तो थेट गृहमंत्रालयाचा दाखला मानणे हे अनुचित ठरेल.
त्या आवाहनातील मूळ संदेश देशाच्या व्यावसायिक हितासाठी तरी उत्तम आहेच.
चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकावा हा उत्तम संदेश या आवाहनात्मक संदेशातून छान लक्षात येतो परंतु त्याचवेळी ‘ते विषारी फटाके व घातकी दिवे देशात कसे काय पोहोचले तथा पोहोचू दिले गेले तथा जाणार आहेत’, असाही सवाल पडतोच.
त्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत व युथ वेलफेअर असोसिएशनचा आगामी “दिवाळी बाजार” ह्या उपक्रमाची वार्ता जास्त उत्तम आश्वासकता देणारी आहे.
कणकवलीमध्ये भरवल्या जाणार्या दिवाळी बाजारात मातीचे दिवे,कंदील तथा स्थानिक महिला बचतगटामार्फत केला जाणारा फराळ विक्रीसाठी उपलब्ध असेल. स्थानिक कुंभारकाम व पाककला कौशल्याला एक व्यावसायिक मंच मिळणार आहे.
गांव,शहर,तालुका,जिल्हा,विभागीय,राज्य व राष्ट्रीय पातळीवर हा असा उपक्रम राबवला गेला तर खरेच राष्ट्रीय व्यावसायिक सुरक्षा तरी नक्कीच उत्तम राखली जाईल आणि कुठल्याही आक्रमणाच्या धोक्याशिवाय सण उत्साहात व विना वायफळ अतीदक्षतेचे साजरे करता येईल.
कणकवली येथील दिवाळी बाजार हा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर असा भरवला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रहीत जपू पहाणारे सिंधुदुर्गवासीय तिथे भेट देतीलच यात शंका नाही.
सुयोग पंडित.
(मुख्य संपादक /आपली सिंधुनगरी न्यूज)