मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात हॉटेल, बार, लाऊंज, कॅफे येथे मद्यपान करणे आता महागणार आहे. सरकारने हॉटेल, लाऊंज, बार, कॅफेमधील दारू विक्रीवरील व्हॅट १ नोव्हेंबरपासून दुप्पट वाढवला आहे. सध्या हा कर ५% टक्के आहे. पण दारू दुकानातून होणाऱ्या विक्रीवरील कर जैसे थे ठेवण्यात आलेला आहे. तसेच स्टार हॉटेल्समधील मद्यावर यापूर्वीच २० % व्हॅट असल्याने तो ही कर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंटस ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की ही करवाढ धक्कादायक आहे. वार्षिक अबकारी कर यापूर्वीच वाढलेला आहे. या करवाढीमुळे हॉटेल आणि बारमधील दारू महाग होणार आहे. पर्यटन वाढवण्यासाठी सर्व राज्यांत स्पर्धा सुरू आहे. गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा या राज्यांतील अबकारी कर कमी आहे.
हॉटेल आणि बारमधील दारू महागल्यानंतर लोक इतर स्वस्तातील पर्याय शोधतील अशी भीती काही व्यावसायिकांनी व्यक्त केली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.