मसुरे | प्रतिनिधी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आंबिया बहार मध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे यासाठी शेतकरी सहभाग करिता विमा पोर्टल सुरू झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करावे असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.
कोकण विभागामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू व केळी पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल (आंबा व काजू ५ वर्षे).कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छीक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैंकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरिता ३१ ऑक्टोबर २०२३ आंबा व काजू पिकाकरिता ३० नोव्हेंबर २०२३ अशी आहे आंबा पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा हप्ता ७०००/- व काजू पिकाकरिता प्रती हेक्टरी ५०००/- याप्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.