वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर उपस्थित.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची ‘इन्सुली सबस्टेशन अंतर्गत’ येणाऱ्या गावांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका परशुराम नाईक, बांदा उपसरपंच जावेद ख़तीब, वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, बाळ बोर्डेकर, तालुका अध्यक्ष संजय लाड, सदस्य संतोष तावडे, समीर शिंदे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, आरोस तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजन नाईक, बांदा व्यापारी संघाचे मंगलदास साळगावकर, सुनील देसाई, अशोक देसाई, अमित गुळेकर, शांताराम काणेकर, हनुमंत सावंत, शिवराम राऊळ, राजेश बांदेकर, महादेव कदम, दशरथ मळगावकर, गंगाराम शेर्लेकर, शांताराम काणेकर, सूरज राऊळ आदी उपस्थित होते.
या बैठकीत विविध गांवातून आलेल्या वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची ग्राहकांसोबतची वर्तणूक, वीज सेवेची निकृष्टता, पुन्हा पुन्हा लाईट जाणे, भरमसाठ बिले, चुकीची बिले, वीज वितरणचे बिघडलेले नियोजन, विजेची अनियमितता, उपकरणांच्या देखभाली बाबत वीज वितरणची उदासीनता अश्या अनेक प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून मांडण्यात आल्या व वीज वितरणच्या कारभारा बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज ग्राहकांच्या तक्रारी समजून घेतल्यानंतर सर्वानुमते दिनांक १९ ऑक्टोबर व २० ऑक्टोबरच्या दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन्सुली सबस्टेशन मधील ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
काल संपन्न झालेल्या या वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी अल्पावधीतच वीज ग्राहकांच्या सहभागाने संघटनेमार्फत झालेल्या सकारात्मक कामाची माहिती दिली व संघटनेच्या कार्यपद्धती विषयी माहिती दिली. जिल्हा सचिव निखिल नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यामागची संकल्पना व संघटनेची उद्दिष्ट्ये अधोरेखित करून संघटनेच्या बळावर ग्राहकांना आपले हक्क कसे मिळवून दिले जाऊ शकतील याची माहिती दिली. जिल्हा समन्वयक बाळ बोर्डेकर यांनी तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून विविध नियमांची माहिती ग्राहकांना करून दिली त्यानंतर बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनीही महावितरणच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्परतेने कामाकरत असले बाबत संघटनेची प्रशंसा केली.
बांदा उपसरपंच जावेद ख़तीब यांनी ग्राहकांना उद्भवीणारे विविध प्रश्न मांडून वीज ग्राहक संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट व तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.