मुंबई | ब्यूरो न्यूज : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने ‘छत्रपती शिवाजी पार्क’ दादर येथील महत्वाचा असणार्या दसरा मेळाव्यासाठीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. शिंदे गटाने त्यांचा छत्रपती शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा अर्ज मागे घेतल्याने याविषयीच्या अधिक घडामोडींना विराम लागला आहे.
मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर यावर्षी देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाने मैदानासंदर्भात महापालिकेकडे केलेला अर्ज आता मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न शिंदे गटासमोर आहे. त्यासाठी जागेचा शोधही शिंदे गटाने सुरु केला आहे. मुंबईतील ओव्हल मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजीत होऊ शकतो असेही सूत्रांकडून संकेत मिळत आहेत.
दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊ नये आणि घ्यायचा असेलच तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा असा सल्ला वैभव नाईक यांनी दिला पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे. मोदी- शहांच्या विचारांचे मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे मूळ विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही. ह्यांच्या हातात आता पक्षाची ध्येय, धोरणे राहिली नसून ती भाजपच्या हातात आहेत. शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार आहे, अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्यावी कारण भाजपमध्ये तुमचा गट विलीन होणार आहे. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातो आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला गर्दी कशी होते, कोण उत्तर भारतीय होते, कोण बिहारी होते, कोण भाषण करताना लोक उठून गेले, हे सगळ्यांनी गेल्या वर्षी अनुभवलं आहे असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मात्र शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ती शिवसेनेच्या पारंपरिक व एकनिष्ठ विचारांचे सोने लुटायला येतात असेही मत आमदार वैभव नाईक यांनी मांडले आहे .