मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे बाजारपेठ येथील रहिवाशी, सेवानिवृत्त माजी सैनिक, भारतीय वेटलिफ्टर संघातील माजी खेळाडू आणि पुणेस्थित रवींद्र उर्फ बाळा मोहन दुखंडे (वय ५८ वर्षे) यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. भारतीय लष्कराने रवींद्र दुखंडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुणे येथील स्मशान भुमित रवींद्र दुखंडे यांच्या वर विविध शेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची ज्येष्ठ कन्या ऋग्वेदा दुखंडे हिने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार केले. वेटलिफ्टर खेळाडू म्हणून रवींद्र दुखंडे यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व अनेक स्पर्धांमधून केले होते. सैन्य दलातील सेवा करून ते सेवानिवृत्त झाले होते.
कै. रवींद्र दुखंडे हे १९८२ला भारतीय सैन्य दलात इंजिनिअर ग्रुपमध्ये दाखल झाले. सैन्य दलात असताना त्यांची स्पोर्ट्स मधून भारतीय टीम मध्ये वेटलिफ्टर म्हणून निवड झाली होती. वेटलिफ्टिंग या खेळामध्ये रवींद्र दुखंडे यांनी अनेक सुवर्ण , रौप्य, कांस्य पदके देशाला आणि सैन्य दलाला मिळवून दिली होती. गेली पाच वर्ष ते पुणे येथे जलद कृती दलात इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत होते. काही काळ त्यांनी स्वतःची सिक्युरिटी एजन्सी सुद्धा निर्माण करून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला होता. रवींद्र दुखंडे हे बाळा या टोपण नावाने सर्वत्र परिचित होते. शालेय ते कॉलेज जीवनात ते खेळाडू म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध होते. क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, मलखांब, धावणे,लांब उडी, गोळा फेक अशा विविध खेळांमध्ये त्यांनी मसूरे गावचे नाव उज्वल केले होते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून रवींद्र दुखंडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओळख होती. अनेक तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय, स्पर्धांमधून त्यांनी पदके मिळवली होती. वेटलिफ्टिंग या खेळामध्ये त्यांचे संपूर्ण देशात एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मोठे नाव होते. वेटलिफ्टिंग या खेळामधून त्याने भारतीय संघात स्थान मिळवले होते. या खेळामध्ये त्यांनी अनेक पदके प्राप्त केली होती. काही काळ त्यांनी नवोदित वेटलिफ्टर खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून सुद्धा भूमिका पार पाडली होती. ते उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे मोठे नाव होते. गावातील धार्मिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे होते. अनेक गरजवंत विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहीण, भावजय, पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार असून पुणे महानगरपालिका विद्यानिकेतन विश्रांतवाडी शाळेतील माजी मुख्याध्यापिका रेश्मा दुखंडे यांचे ते पती, डॉक्टर योगिता दूखंडे आणि ऋग्वेदा दुखंडे यांचे ते वडील तर
सावडाव खलांत्री जिल्हा परिषद शाळेतील आदर्श मुख्याध्यापक किसन दुखंडे, मसुरे येथील रिक्षा व्यावसायिक तथा युवा सामाजिक कार्यकर्ते महेश दुखंडे यांचे ते बंधू, युवा सामाजिक कार्यकर्ते रोशन दुखंडे यांचे ते काका तर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटकर यांचे ते मेहुणे होत.