मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळीची वाडी तळाशील येथील समुद्रात आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक बुडून बेपत्ता झाला व तासाभराने त्याचा मृतदेह १०० मीटर अंतरावर सापडला. त्याच्या मित्राला स्थानिक वाचवू शकले. अमोल करपी असे मृत तरुणाचे नाव आहे. बेळगांव येथील हा मयत तरुण ३६ वर्षांचा होता.
बेळगांव येथील चार तरुण सायंकाळी तळाशील येथे पर्यटनासाठी आले होते. यातील अमोल करपी व त्याचा अन्य एक साथीदार हे दोघे पाण्यात उतरले तर अन्य दोघे हे किनाऱ्यावरतीच उभे होते. समुद्रातील भोवऱ्याच्या पाण्यात हे दोघेही बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच ललित देऊलकर, प्रमोद चोडणेकर, बाबू तोरसकर, बाबल चोडणेकर, चेतन खवणेकर, प्रमोद तोरसकर, सागर निवतकर यांच्यासह अन्य स्थानिकांनी समुद्रात धाव घेत एकाला वाचविले. मयत अमोल करपी हा लाटांच्या प्रवाहात समुद्रात बुडून बेपत्ता झाला. स्थानिकांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू होता.. यातच ८ वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर, सुशांत पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू होती. समुद्रात बुडून मृत्यू पावलेला अमोल करपी हा सिव्हील इंजिनियर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.