प्रसाद लोके खून प्रकरण.
ब्युरो न्यूज | देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबांव येथील विवाहीत युवक प्रसाद परशुराम लोके या युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर पवार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, गाडी व रक्ताळलेले कपडे हस्तगत केले आहे. दरम्यान प्रसाद लोके याचा निर्घृण खून का केला यामागे ‘गंभीर व मोठे’ कारण असल्याची चर्चा आहे. ३१ वर्षे वयाच्या मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके याचा सोमवारी सकाळी मुणगे मसवी रस्त्यावर त्याचाच गाडीच्या बाजुला रक्ताचा थारोळ्यात मृतदेह आढळला. त्याला रविवारी भाडे तत्वावर गाडी पाहिजे आहे असा फोन आल्यानंतर सोमवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान तो त्याचा ताब्यातील ‘वॅगन आर’ ही चारचाकी घेऊन घरातून गेला होता. गाडीभाडे तत्वावर पाहिजे असल्याचा फोन आला असे त्याने परिवाराला सूचीत केले होते. दरम्यान मुणगे मसवी रस्त्यावर सोमवारी पहाटे त्याच्याच गाडीच्या बाजुला प्रसाद याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. याबाबत पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रसाद याचा डोक्यावर, कपाळावर वार करून निर्घृण खुन झाल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा गाडीवरही हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या निर्घृण खूनप्रकरणी प्रसाद याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाता विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वषेण विभाग व देवगड पोलिस यांनी तपासाला युध्दपातळीवर सुरूवात केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला हा गुन्हा मालवण कुंभारमाठ येथील किशोर परशुराम पवार याने केल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारी केवळ १२ तासातच त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी संशयिताला मालवण येथे नेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडी व रक्ताचे डाग असलेले कपडे ताब्यात घेतले. पोलीसांकडून आरोपीची ‘सखोल’ चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.